श्रीगोंद्यातील रस्ते अपघात File Photo
अहिल्यानगर

श्रीगोंद्यातील रस्ते अपघात..चिंतेची बाब; गत आठवड्यातील अपघातांत पाच जण ठार

अपघात रोखण्यासंदर्भात विचारमंथन गरजेचे

पुढारी वृत्तसेवा

श्रीगोंदा : तालुक्यात गेल्या आठवडाभरात झालेल्या वेगवेगळ्या अपघातात पाच जणांना प्राण गमवावे लागले. रस्ते अपघात अन् त्यात मृत्युमुखी पडणार्‍यांची वाढती संख्या ही चिंतेची बाब बनली आहे. राज्य सरकारचे रस्ता सुरक्षा सप्ताह अभियान सुरू आहे. या अभियानाच्या माध्यमातून अपघात रोखता येतील का? यावर विचारमंथन होणे गरजेचे आहे.

गेल्या पाच वर्षांत रस्त्यांची सुधारणा झाली आहे. तालुक्यातून काष्टी-जामखेड आणि नगर-दौंड हे दोन राष्ट्रीय महामार्ग गेले आहेत. दोन्ही महामार्ग काँक्रीटचे तयार करण्यात आले आहेत. रस्ता सुस्थितीत असल्याने दुचाकी वा चारचाकी वाहनचालकाचे वेगावर नियंत्रण राहत नाही. परिणामी अपघात होत असल्याचे दिसून येते. मागील आठवड्यात नगर-दौंड रस्त्यावर झालेल्या अपघातात एकाच दिवशी दोघांना प्राण गमवावे लागले.

आढळगाव येथेही दोन दुचाकीच्या अपघातात दोघे मृत झाले. तर काल लिंपणगाव परिसरात उभ्या असणार्‍या बसला पाठीमागे धडक देत झालेल्या अपघातात एक ठार झाला. आठवडाभरात पाच जणांना प्राण गमवावे लागले. वारंवार होणारे अपघात सर्वांत मोठी समस्या निर्माण झाली आहे. पोलिस, उपप्रादेशिक विभाग वेग मर्यादेच्या बाबतीत वारंवार कारवाया करत असले, तरी वाहनचालक अपेक्षित खबरदारी घेत नाहीत.

काष्टी-जामखेड अन् नगर-दौंड हे दोन्ही रस्ते काँक्रीटचे झाले आहेत. याच रस्त्यावर अपघाताचे सर्वाधिक प्रमाण आहे. या रस्त्याच्या निर्मितीनंतर शेकडो प्रवाशांना अपघातात प्राण गमवावे लागले आहेत. काँक्रीट रस्त्यावर झालेल्या अपघातात बहुतांश अपघातग्रस्त मृत झाल्याचे निरीक्षण नोंदवले गेले आहे.

नियम पाळा, अपघात टाळा

उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकारी प्रियांका क्षेत्रे म्हणाल्या की, वाहतुकीचे नियम पाळले गेले तर अपघातावर नियंत्रण मिळवता येऊ शकते. दुचाकीस्वारांनी दुचाकी चालवताना नियमित हेल्मेट वापरणे गरजेचे आहे. चारचाकी वाहन चालवताना चालकाने सीटबेल्ट लावणे बंधनकारक आहे.

...तर प्राण वाचू शकतात

होणारे अपघात ही चिंतेची बाब असली तरी अपघातग्रस्तांना तिथे उपस्थित असणारे प्रवाशी मदत करत नाहीत ही अधिक चिंतेची बाब आहे. उपस्थितांनी अपघातग्रस्तांना त्वरित मदत केली तर प्राण वाचू शकतात.

रस्ते चांगले झाल्याने वाहनाचा वेग वाढणे क्रमप्राप्त आहे. त्यात दुचाकीस्वार वेगात दुचाकी चालवत असल्याचे अनेकदा पहायला मिळते. वाढते अपघात लक्षात घेऊन वेग मर्यादा अन् अपघात कसे टाळायचे यावर शिबिर घ्यायची वेळ आली तर नवल वाटायला नको.
बाळासाहेब दांगट, काष्टी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT