खेड : खेड (ता. कर्जत) येथे शनिवारी (दि. 5) रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत एकाच रात्रीत पाच घफोड्या केल्या. यातील एकाच घरातील तब्बल दोन लाखांचे दागिने लंपास केले. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे.
घरातील लोक छतावर झोपलेले असताना चोरट्यांनी सहजतेने घरात प्रवेश करीत दागिन्यांवर डल्ला मारला. या प्रकरणी संगीता बापूराव जराड यांनी कर्जत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
फिर्यादीनुसार जराड यांच्या घरातून सोन्या-चांदीचे अंदाजे दोन लाखांचे दागिने चोरट्यांनी लांबवले. याशिवाय सुरेश पवार, रामचंद्र यादव, गणपत मोरे आणि हनुमंत मोरे यांच्या घरांमध्येही चोरीचा प्रयत्न करीत कपाटांची तोडफोड आणि वस्तूंची उचकापाचक करण्यात आली. उन्हाळ्याच्या उकाड्यामुळे जराड कुटुंब छतावर झोपलेली असताना चोरट्यांनी त्यांच्या गैरहजेरीचा फायदा घेत हा धाडसी प्रकार केला. रविवारी सकाळी चोरीचा प्रकार उघडकीस येताच गावात खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच कर्जते पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, तसेच याचा तपास जलद लावावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.