राहुरी: विवाहितेला मारहाण व मानसिक छळ करून, घराबाहेर हाकलून दिल्याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात पतीसह सासू, सासरा या तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
रेशमा बाबासाहेब पंडित (रा. सडे, ता. राहुरी) या 33 वर्षीय विवाहित महिलेने राहुरी पोलिसात फिर्यादी दिली आहे. 26 ऑक्टोबर 2006 रोजी बाबासाहेब राजू पंडित, रा. भावी निमगाव, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर) यांच्यासोबत सडे येथे आई-वडिलांनी मान-सन्मानाने रेशमाचे लग्न केले होते. लग्नानंतर दोन मुली झाल्या. (Latest Ahilyanagar News)
सात वर्षांपर्यंत सासरच्या लोकांनी रेशमाला चांगले नांदविले. त्यानंतर पती अधून-मधून दारू पिऊन तिच्यावर संशय घेऊन मारहाण करु लागला. यामुळे ती सडे येथे माहेरी आली.
पती बाबासाहेब सासरी येऊन, ‘तुला आता यापुढे त्रास देणार नाही,’ असे म्हणत रेशमा हिला तो सासरी घेऊन जायचा. यानंतर थोडे दिवस चांगले नांदविले की, पुन्हा अधून-मधून तिच्यावर संशय घेवून, लाथा-बुक्क्यांनी मारहाण करायचा. सासू रंजना व सासरा राजू पंडीत हेही, ‘लग्नात आमचा मानपान केला नाही,’ असे म्हणत रेशमा हिला नेहमी शिवीगाळ करीत असे.
‘तुुझ्या नावावरील रक्कम आई-वडिलाकडून घेऊन ये,’ अशी मागणी ते करायचे. शिवीगाळ, दमदाटी करून, रेशमा हिचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला मारहाण करून, घरातून काढून दिले. रेशमा बाबासाहेब पंडित या विवाहितेच्या फिर्यादीवरून पती बाबासाहेब राजु पंडित, सासू रंजना राजू पंडीत व सासरा राजू कचरु पंडीत (सर्व रा. भावी निमगाव ता. शेवगाव) यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.