पारनेर: शेतकऱ्यांना खते, औषधांचा पुरवठा करणारे कृषी सेवा केंद्रेच शेतकऱ्यांची लूट करीत असल्याच्या तक्रारी आहेत. तालुक्यातील अनेक कृषी सेवा केंद्रांवर खत आणि औषध विक्रीत अनियमितता, तसेच युरिया शिल्लक असूनही शेतकऱ्याला मिळत नाही, याकडे कृषी विभाग जाणीवपूर्वक डोळेझाक करत आहे, असा आरोप शेतकरी वर्गातून होत आहे.
चालू हंगामात पावसाने पाठ फिरविल्याने बळीराजा चिंतेत होता. उशिराने तालुक्यात काही भागात पेरणीयुक्त पाऊस झाला. शेतकऱ्यांनी पेरणी केली, त्या पिकांना आता खते औषधांची गरज आहे, मात्र, तालुक्यातील कृषी सेवा केंद्रांकडून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट होत आहे.
तसेच खतांमध्ये अनेक खते शिल्लक नाही, असे सांगितले जाते. दुकानदार शेतकऱ्यांना हवी असलेली खते "नाहीत" म्हणून सांगून जास्त नफा असलेली महागडी औषधे आणि बुस्टर माथी मारत आहेत. पक्के बिल न देणे, मुदत संपलेला माल विकणे आणि स्टॉक रजिस्टरमध्ये मोठा घोळ हे प्रकार नित्याचेच झाले आहेत.
सबसिडीवरील युरिया आणि डीएपी काळ्या बाजारात विकून शेतकऱ्यांनाच जास्त दराने विकला जात असल्याच्या तक्रारी आहेत. खते व युरिया स्टॉक हा दररोज अपडेट असणे गरजेचे आहे, पण तसे होत नाही यावर कृषी अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया उलट आहे, ते म्हणतात कृषी सेवा केंद्र एकदम अपडेट करीत असतील याचा अर्थ कृषी अधिकाऱ्यांचे हेतूपूर्वक दुर्लक्ष आहे.
शेतकरी म्हणतात आम्ही शेतीसाठी सल्ला मागायला जातो, पण तिथे आमच्या पिकाचा विचार न करता दुकानदाराच्या कमिशनचा विचार होतो. कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली तरी अनेक महिने होऊन गेले तरी कोणी फिरकतही नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया एका शेतकऱ्याने व्यक्त केली.
या सर्व बाबींचा कृषीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेणे गरजेचे आहे. तातडीने तालुक्यातील सर्व कृषी सेवा केंद्रांची तपासणी करून दोषींचे परवाने रद्द करावेत. अन्यथा आंदोलन करू, असा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे.
शेतकऱ्यांची ठरवून लूट
बऱ्याच कृषी सेवा केंद्रावर जुने खते उपलब्ध होते. दर वाढणार असल्याने त्यांनी शेतकऱ्यांना खते दिले नाहीत. दर वाढल्यानंतर त्या दराने विक्री होण्याची शक्यता आहे, यावर कृषी विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे. युरिया लिंकिंगमुळे ठरवून तुटवडा दाखवला जातो. यावर कृषी अधिकाऱ्यांचे नियंत्रण नाही. कृषी विभाग व कृषी सेवा केंद्र ठरवून शेतकऱ्यांची लूट करीत नाहीत ना, असा सवाल शेतकरी नेते अनिल देठे पाटील यांनी केला आहे.
कृषी अधिकारी गायब
कृषी सहाक मदतीसाठी की फक्त कागदी घोडे नाचण्यासाठी, तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून ना तपासणी, ना नमुने. त्यामुळे बोगस औषधांचा सुळसुळाट. कृत्रिम टंचाई हंगामात खत स्टॉकमध्ये नाहीस असे सांगून नंतर जास्त दराने विक्री होते, यावर कृषी विभाग कारवाई करात नसल्याने शेतकऱ्यांचा विश्वास उडाला आहे.