वाळकी : नगर तालुक्यातील दक्षिण भागात गेल्या दोन दिवसांपासून वादळी वार्यासह होत असलेल्या पावसाने शेतकर्यांनी दाणादाण उडाली आहे. कांदाचाळीवरील पत्र्यांसह घरावरील पत्रे उडाल्याने मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे कांदा सडल्याने शेतकर्यांना आर्थिक फटका बसला आहे. वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी शेतकर्यांनी केली आहे.
तालुक्यातील भोरवाडी, अकोळनेर, सारोळा कासार परिसरात वादळी वार्यासह जोरदार पाऊस झाला. भोरवाडीत शेतकर्यांच्या कांदा चाळीवरील पत्रे वादळी वार्यामुळे उडाल्याने चाळीतील पूर्ण कांदा पावसाने भिजला. काही ठिकाणी घरावरील, जनावरांच्या गोठ्यावरील पत्रे उडाले. कांद्याच्या शेडमध्ये पाणी गेल्याने विकास सतीश ठाणगे, नंदू खैरे, बंडू खैरे, उत्तम जासूद या शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले. (Ahilyanagar News Update)
पूर्व भागातील कांद्याचे आगार समजल्या जाणार्या भातोडी, पारगाव, पारेवाडी, कौडगाव, जांब, मेहेकरी, सोनेवाडी परिसरात मागील दहा दिवसांपासून वादळी वारा व सततच्या अवकाळी पावसामुळे कांदा पिकासह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. प्रशासनाने या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकर्यांकडून केली जात आहे.
यंदा मे महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी छोटे बंधारे व साठवण तलावामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. अनेक ठिकाणी ओढ्या-नाल्यांना आलेले पाणी व नद्यांमधून वाहणार्या पाण्यामुळे स्थानिक नळ पाणीपुरवठा योजनांना संजीवनी मिळाली आहे. पाण्याअभावी जळून चाललेल्या फळबागांना अवकाळी पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
वादळी वार्यामुळे भोरवाडीत कांदा चाळ, जनावरांचा गोठा व घरावरील पत्रे उडाले आहे. त्यामुळे बहुतांशी शेतकर्यांचे कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्हाधिकार्यांनी महसूल व कृषी विभागाला पंचनाम्याचे आदेश देऊन सरकारने प्रत्येक शेतकर्याला नुकसानभरपाई द्यावी.राहुल जाधव, ग्रा. पं. सदस्य, भोरवाडी
अवकाळी पावसामुळे काही प्रमाणात फायदा जरी झाला असला, तरी कांदा उत्पादक शेतकर्यांचे मात्र कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. विशेषतः भातोडी, पारगाव, पारेवाडी, पिंपळगाव लांडगा, सोनेवाडी, मेहेकरी या भागात मोठ्या प्रमाणात कांद्याचे पीक घेतले जाते.
वाळकी, देऊळगाव सिद्धी, राळेगण, गुंडेगाव, वडगाव तांदळी, दहिगाव, गुणवडी आदी परिसरात दोन दिवसांपासून होत असलेल्या वादळी पावसाने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीला आलेला कांदा शेतामध्ये काढून पडलेला कांदा, तसेच उघड्यावरील साठवलेल्या कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गावरान आंबा, डाळिंब, संत्रा, मोसंबी या फळबागांचेही मोठे नुकसान झाले. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात प्रशासनाकडे चौकशी केली असता त्यांच्याकडून निश्चित माहिती मिळू शकली नाही.