नगर: अहिल्यानगरमध्ये ग्रामविकास विभागाचा सात कोटींची कामे असलेला बनावट शासन आदेश आणून फसवणूक केल्याप्रकरणी कोतवाली व भिंगार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मात्र हा आदेश नेमका कोठून आला, त्याची शहानिशा न करता कोणी अंमलबजावणी केली, याबाबतच्या चौकशीसाठी अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर यांनी त्रिसदस्यीय समिती नेमली आहे. त्यामुळे या समितीच्या अहवालात त्या शासन आदेशाच्या मंत्रालय ते नगर या प्रवासाचे कोडे उलगडणार आहे. (Latest Ahilyanagar News)
राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच अहिल्यानगरमध्ये ग्रामविकास विभागाचा 7 कोटींची 45 कामे असलेला बनावट शासन आदेश उघडकीस आला. यामुळे नगरच्या सार्वजनिक बांधकाम विभागावरच संशयाचे धुके दाटून आले. बांधकाम विभागाने या प्रकरणापासून स्वतःला दोन हात दूर ठेवताना ठेकेदाराने हा बनावट आदेश आणून दिला, असे सांगून संबंधितावर गुन्हा दाखल केला.
तर भिंगार पोलिस कॅम्पमध्ये एका अज्ञात व्यक्तीने हा आदेश आणून दिला, अशी हास्यास्पद फिर्याद विद्युत विभागातून देण्यात आली. श्रीगोंद्यातूनही पोलिसांना एक अर्ज दिला गेल्याचे समजते. त्यामुळे ठेकेदारांवर जबाबदारी झटकून सार्वजनिक बांधकाम विभाग स्वतःला वाचवत असल्याचा आरोप सामाजिक संघटना करत आहेत. त्यामुळे अधीक्षक अभियंता बावीस्कर यांनी या प्रकरणात आपल्या विभागाचेही कोणी सहभागी असतील तर त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, हा हेतू डोळ्यासमोर ठेवून चौकशी समितीची स्थापना केली आहे.
रोजगार हमी योजनाचे कार्यकारी अभियंता कुंदनराव दंडगव्हाळ हे समितीचे अध्यक्ष, तर उपकार्यकारी अभियंता अतुल तारगे, विभागीय लेखापाल बिपीन राजोरा हे सदस्य आहेत. समितीस सहायक म्हणून कनिष्ठ लिपिक अमोल पठाडे हे काम पाहणार आहेत. ही समिती ग्रामविकास विभागातील सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करावयाच्या कामांबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचना व प्रचलित कार्यपद्धती याबाबत अहवाल सादर करणार आहे.
तसेच बनावट शासन निर्णयाची सुरुवात कशी झाली, शासन निर्णयाची शहानिशा न करता अंमलबजावणी कोणी केली, यास जबाबदार कर्मचारी, अधिकारी यांची नावे शोधली जाणार आहेत. तसेच अशी घटना पुन्हा घडू नये, यासाठी उपाययोजना व आवश्यक बाबी यावरही समिती अहवाल सादर करणार आहे. दि. 25 जुलैपर्यंत हा अहवाल सादर करण्याच्या सूचना अधीक्षक अभियंता बावीस्कर यांनी केल्या आहेत.
पोलिस तपासात ‘कनेक्शन’ उघड होणार?
कोतवाली पोलिसात ठेकेदारावर गुन्हा दाखल आहे. मात्र आरोपी अद्याप ताब्यात नाही. आरोपी पकडल्यानंतर अनेक बाबी पुढे येणार आहेत. यात हा आदेश त्यांना कोणी दिला, तो नगरच्या सार्वजनिक बांधकाम विभागात कोणाकडे दिला, यात दोषी फक्त ठेकेदार आहे की त्यांना ‘बळीचा बकरा’ बनवला जात आहे, याचाही उलगडा होणार आहे. भिंगार कॅम्पमध्ये अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल झाल्याने विद्युत विभाग संशयाच्या फेर्यात अडकला आहे. त्यामुळे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी लक्ष घातल्यास बनावट आदेशाचा मंत्रालय ते नगर प्रवास समोर येणार आहे.