Fake currency racket in Pathardi
पाथर्डी: पाथर्डी शहर आणि तालुक्यात पुन्हा एकदा पाचशेच्या बनावट नोटांचा सुळसुळाट झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह स्थानिक व्यापार्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. किरकोळ व्यवहार करणारे, हातावर पोट असलेले दुकानदार आणि टपरीधारकांना याचा मोठा फटका बसत असून, बनावट नोटा स्वीकारून त्यांची फसवणूक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शहरातील एका किराणा दुकानदाराला तीन दिवसांपूर्वी एका ग्राहकाने सामान खरेदी करताना पाचशे रुपयांची बनावट नोट दिली. व्यवहारानंतर दुकानदाराच्या लक्षात ही बाब दुसर्या दिवशी लक्षात आली. प्राथमिक चौकशीत ही नोट बनावट असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पुन्हा एकदा पाथर्डी शहरात बनावट नोटांचे रॅकेट सक्रिय झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Latest Ahilyanagar News)
तालुक्यात यापूर्वीही बनावट नोटांच्या काही घटना घडल्या होत्या. पाथर्डी तालुक्यातील दोन आरोपींना पर जिल्ह्यात बनावट नोटा बाळगून त्या चलनामध्ये वापरताना दुकानात खरेदी करीत असताना दुकानदाराच्या मदतीने पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यापैकी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. दुसरा फरारी आला होता. त्यामुळे हे रॅकेट केवळ शहरी भागापुरते मर्यादित न राहता आता ग्रामीण भागातही शिरकाव करत असल्याचे चित्र आहे.
शहरातील मुख्य बाजारपेठेसह छोट्या दुकानांत, टपर्यांवर, हातगाड्यांवर आणि रस्त्यावर विक्री करणार्या व्यावसायिकांना बनावट नोटा स्वीकारण्यामुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. अशा व्यावसायिकांमध्ये बहुतेक जण हातावर पोट असलेले आहेत. त्यामुळं अशा प्रकारची फसवणूक त्यांच्यासाठी मोठे संकट ठरत आहे. मागील काही काळात अनेक प्रकारचे आर्थिक गुन्हे आणि फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. स्थानिक गुन्हेगारी प्रवृत्तीचे काही लोक बनावट नोटांच्या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. हे लोक वेगवेगळ्या निमित्ताने चर्चेत येत आहे.