‘भूजल’चे बनावट प्रमाणपत्र File Photo
अहिल्यानगर

Fraud news : सौरपंपासाठी ‘भूजल’चे बनावट प्रमाणपत्र

जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वैज्ञानिकांची पोलिसांत धाव

पुढारी वृत्तसेवा

नगर : जिल्हा परिषदेच्या जलजीवन योजनेतील कार्यकारी अभियंत्यांच्या बोगस स्वाक्षरीचे वर्कडन आढळल्याच्या घटनेनंतर आता भूजलचे सहायक वैज्ञानिक अजिंक्य काटकर यांच्या बनावट स्वाक्षरीने सौरपंपासाठी प्रमाणपत्र वाटले जात असल्याचीही धक्कादायक माहिती पुढे आली आहे. याप्रकरणी संबंधित अधिकारी काटकर यांनी कोतवाली पोलिसात तक्रार दिली आहे.

याबाबतची माहिती अशी की, जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागात सहायक भूवैज्ञानिक या पदावर अजिंक्य काटकर हे कार्यरत आहेत. त्यांना 25 फेब्रुवारी रोजी एका व्यक्तीने भ्रमणध्वनीवरून फोन करून एक स्क्रीन शॉट शेअर केला व सौरपंप योजनेसाठी भूजल विभागाकडील प्रमाणपत्राची मागणी केली. मात्र हे प्रकरण वरिष्ठ भूवैज्ञानिक कार्यालय भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडील असल्याने आपण त्या कार्यालयाकडे रितसर मागणी नोंदवावी, असे आवाहन केले. मात्र त्या इसमाने तुम्ही आमच्या शेजारच्या गावातील लोकांना कसे काय प्रमाणपत्र दिले, असा जाब विचारत त्यांची स्वाक्षरी असलेले एक प्रमाणपत्रच स्क्रीन शॉट काढून त्यांच्या मोबाईलवर पाठवले. दरम्यान, काटकर यांनी हे प्रमाणपत्र पाहताच ते बनावट असल्याचे ओळखले. कारण त्या प्रमाणपत्रावरील तारखेला काटकर यांच्याकडे वरिष्ठ कार्यालयाचा पदभारच नव्हता, त्यामुळे आपण स्वाक्षरी करण्याचा संबंधच नाही, हे लक्षात येताच त्यांनी वरिष्ठांना याबाबत कल्पना दिली. हे प्रमाणपत्र बनावट आहे, तसेच आपली स्वाक्षरी मॉर्फ करून ती वापरण्यात आल्याची तक्रार काटकर यांनी कोतवाली पोलिसात दिली आहे.

बनावट प्रमाणपत्र देणारी टोळी?

जिल्ह्यात 1598 पैकी केवळ 444 गावांना या सौरपंप योजनेसाठी भूजल विभागाचे पत्र देणे शक्य आहे. अपात्र गावातील लाभार्थ्यांना भूजल विभागाच्या नावाने फसवणारी मोठी टोळी कार्यरत असण्याची शक्यता आहे.

संगमनेरातून प्रकार आला उघडकीस

हे बनावटप्रमाणपत्र संगमनेर तालुक्यातील पारेगाव बुद्रुक येथील एका शेतकर्‍याकडे आढळले आहे. हे गाव अतिशोषीत वर्गवारीमध्ये मोडणारे गाव आहे. त्या गावासाठी सौरपंप योजनेचा लाभ घेण्यासाठी हे प्रमाणपत्र वापरले असल्याचे दिसले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT