पारनेर राष्ट्रवादीत गटबाजी उफाळली; आ. दाते यांनी मंत्री झिरवळ यांच्यासमोर व्यक्त केली खंत Pudhari News
अहिल्यानगर

पारनेर राष्ट्रवादीत गटबाजी उफाळली; आ. दाते यांनी मंत्री झिरवळ यांच्यासमोर व्यक्त केली खंत

रथयात्रेच्या सभेला कार्यकर्त्यांची पाठ

पुढारी वृत्तसेवा

शशिकांत भालेकर

पारनेर: गटबाजी थांबली नाही, तर तालुक्यातून राष्ट्रवादीचा शेवट होईल, असे वक्तव्य आ. दाते यांनी काढले. पारनेर येथे गौरव मंगल कलश रथयात्रेनिमित्त झालेल्या सभेला राष्ट्रवादी (अजित पवार) काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पाठ फिरवली.

सभेला गर्दी न झाल्याने आ. दाते यांनी तालुक्यातील गटबाजीबाबत भाष्य करत नाराजी व्यक्त केली. यामुळे पारनेर राष्ट्रवादीत गटबाजी उफाळली असून, वरिष्ठ यावर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (latest ahilyanagar news)

रथयात्रेनिमित्त पारनेर येथे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या उपस्थितीत लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयत जाहीर सभा घेण्यात आली. या वेळी कार्यकर्त्यांची कमी संख्या पाहून आ. दाते यांनी नाराजी व्यक्त करत माझ्याकडे कार्यालयात विकासकामे व इतर कामांसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. मात्र, रथयात्रेसाठी कार्यकर्त्यांची कमी संख्या उपस्थित राहणे ही माझ्यासारख्या कार्यकर्त्यासाठी लांच्छनास्पद आहे, असे वक्तव्य केले.

विधानसभेसाठी पक्ष तालुक्यात उभा राहिला; परंतु पक्षातील भांडणे संपलेली नाहीत. तालुक्यात राष्ट्रवादीमध्ये प्रचंड गटबाजी आहे. वरिष्ठ पातळीवर काड्या लावण्याची कामे केली जातात. तालुक्याच्या विकासासाठी झगडत आहे. तालुक्यातील पठार भागावर पाणी आणण्यासाठी पहिल्या दिवसापासून प्रयत्न करत आहे.

तालुक्यात आलेल्या रथयात्रेचे अशा पद्धतीने स्वागत होत असेल, तर हे तालुक्यात सहन करून घेतले जाणार नाही. विकासाची कामे पाहिजे ते मागून घ्या; पण गटबाजी कोणी करत असेल तर ते उचित नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले.

कार्यकर्ते नेते व्यासपीठावर येऊन बसतात. खाली कार्यकर्त्यांना येऊ नका म्हणून सांगतात ही पद्धत चुकीची आहे. मी गरीब आहे; पण स्वाभिमानी आहे. जनतेसाठी काम करत आहे. प्रपंचासाठी काही काम करत नाही, तरीही माझ्याबाबत रथयात्रा येणार असल्याने जास्त प्रमाणात चुकीच्या पद्धतीने समाज माध्यमांवर ट्रोल केले जात आहे हे विरोधकांकडून नाही तर पक्षांतर्गत होत आहे, असे म्हणत मंत्री झिरवळ यांच्यासमोर आ. दाते यांनी मनमोकळे केले.

कार्यक्रमाला उपस्थिती पाहून तळपायाची आग मस्तकाला गेली आहे. रोज यापेक्षा दहापट संख्येने कामे घेऊन कार्यकर्ते येत असतात. मग या कार्यक्रमाला नागरिक का येत नाहीत, कोण यांना येऊ नका म्हणून सांगते का, याचा सोक्षमोक्ष झाला पाहिजे, असे आ. दाते यांनी म्हटले.

गटबाजीबाबत आ. दाते हतबल!

तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाविरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गट अशी विधानसभेला दुरंगी लढत झाली. या लढतीत आ. काशिनाथ दाते जवळपास दीड हजार मताच्या फरकाने विजयी झाले. मात्र, असे असताना सहा महिन्यांमध्ये पक्षांतर्गत गटबाजी उफाळली. तालुक्यात राष्ट्रवादी अजित पवार गटात सर्वकाही आलबेल नसल्याचे यामुळे समोर आले आहे. याबाबत आ. दातेही हतबल असल्याचे दिसून आले.

गटबाजीचा विचार न केल्यास पक्षाचा शेवट

चाळीस वर्षे तपश्चर्या केल्यानंतर पदाची संधी मिळाली. माझ्यानंतर नवीन पिढीला संधी आहे; पण नवीन पिढी अशा पद्धतीने वागली तर हे चांगले नाही. पहिल्यापासून तालुक्यात राष्ट्रवादी पक्ष हा तळागाळापर्यंत रुजलेला आहे. परंतु कार्यकर्ते- पुढार्‍यांत मतभेद आहेत. पक्षश्रेष्ठींना याचा विचार भविष्यात करावा लागेल. विचार केला नाही, तर तालुक्यातील राष्ट्रवादीचा पुन्हा शेवट होईल, असे आ. दाते म्हणाले.

कार्यकर्त्यांबाबत विचार करावा लागेल

तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर आली आहे. पारनेर येथे रथयात्रेनिमित्त आ. काशिनाथ दाते यांनी थेट तालुक्यात पक्षांतर्गत होत असलेल्या गटबाजीवर जोरदार हल्ला चढवत नाराजी व्यक्त केली. प्रत्येक गावात विकासकामे करत असताना यापुढे कार्यकर्त्यांबाबत निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा आ. काशिनाथ दाते यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT