राजेंद्र जाधव
अकोले : अकोले शहरासह राजूर,कोतुळ तसेच पर्यटन स्थळ असलेल्या भंडारदर्यातील लॉजींग गुन्हेगारीचे केंद्रबिंदू ठरत आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या तीन घटना समोर आल्या आहेत. त्या अनुषंगाने संबंधित लॉज व्यवस्थापक तसेच संशयित तिघा तरुणांना गजाआड केलेले आहे.
याशिवाय याच लॉजवर गुन्हेगारांच्या बैठका, कट, कारस्थाने रचले जात असल्याचे समोर आले. त्यामुळे अजुनही ‘त्या’ लॉजवर पोलिसांचे लक्ष पोहचलेले नसल्याने आणखी एखाद्या घटनेची ते वाट पाहत आहे का, असा सवाल अकोलेकरांमधून उपस्थित केला जात आहे.
तालुक्यात अकोले शहर, इंदोरी फाटा, कोतुळ, राजूर, रंधा फॉल, भंडारदरा परिसरात अनेक लॉज झालेले आहेत. लॉच मालकांकडून महिला, मुली व तरुणींना पैशाचे आमिष दाखवून लॉज उपलब्ध करून दिले जात असल्याची चर्चा आहे. अशा महिलांचे एक रॅकेट कार्यरत आहे.
हे रॅकेट मुला आणि मुलींना लॉज उपलब्ध करून देऊन त्यांच्याकडून भरभक्कम रक्कम आकारतात. यावेळी संबंधित मुला-मुलींचे वय देखील बघितले जात नाही. इतकेच नव्हे तर लॉजच्या नोंदवहीत अनेकवेळेला काहीही नोंद केली जात नाही. अशाप्रकारे नियमावली बाजुला ठेवून खोल्या उपलब्ध करून देणार्यांवर कोणतीच कारवाई केली जात नसल्याचेही दिसते.
आपली मुलगी विद्यालय, महाविद्यालयात जाते की, अन्यत्र कोठे जाते, याकडे पालकांनी बारकाईने लक्ष ठेवावे, असे आवाहन पोलिस यंत्रणेकडून केले जात आहे. विद्यालय आणि महाविद्यालयात देखील प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे. या विषयावर समुपदेशन, कार्यशाळा सतत घेण्याची गरज आहे, परंतु शाळा, महाविद्यालये हे करणार का? हा प्रश्नच आहे.
तालुक्यात अकोले शहर, इंदोरी फाटा, कोतुळ, राजूर, रंधा फाँल, भंडारदरा परिसरात सुमारे 26 लॉज असून, बहुतांश लॉज धारकांनी पर्यटन, जिल्हाधिकारी व पोलिस प्रशासनाकडून अद्यापही रितसर परवानगी घेतलेली दिसत नाही. त्यात ग्राहकांच्या आधार कार्ड, कोठून आलात, कशासाठी आलात आणि कोठे जाणार, या रजिस्टरवर नोंद नसल्याचे लॉज रजिस्टरवरून पोलीस व पर्यटन यंत्रणेच्या तपासणीत आढळून आले. तरीही मात्र संबंधितांवर कारवाई करण्यासाठी प्रशासन धजावत नसल्याने आश्चर्य व्यक्त केेले जात आहे.