पेयजल योजनेचे काम अपूर्ण  file photo
अहिल्यानगर

Nagar : दोन पाणीयोजना राबवूनही गाव तहानलेलेच

आल्हणवाडीत अधिकार्‍यांचा प्रताप; लाखो रुपयांचा निधी पाण्यात

पुढारी वृत्तसेवा

राष्ट्रीय पेयजल योजनेतून पाथर्डी तालुक्यातील आल्हणवाडी येथे पन्नास लाख रुपये खर्चाची पाणीयोजनेचे काम अर्धवट असतानाच जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने त्याच ठिकाणी सुमारे पावणेदोन कोटी रुपयांची जलजीवन योजनेतून पाणीयोजना सुरू केली आहे. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा निधी पाण्यात गेल्याचे गंभीर बाब समोर आली आहे. यावर अद्याप ठोस कारवाई झाली नाही.

राष्ट्रीय पेयजल योजनेचे पन्नास टक्केसुद्धा काम पूर्ण नसताना संपूर्ण बिले काढून संबंधित अधिकार्‍यांनी प्रताप केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

आल्हणवाडी अंतर्गत येणार्‍या खांडगेवस्ती येथे राष्ट्रीय पेयजल योजनेच्या टाकीचे बांधकाम अपूर्ण असतानाच त्या शेजारी जलजीवन योजनेच्या उंच टाकीचे काम सुरू असल्याचे दिसत आहे. मुळात राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे .त्यात एकाच ठिकाणी लागोपाठ दोन योजना राबवून संबंधित विभागाने ठेकेदारासह आपले उखळ पांढरे केले आहे.

जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उप अभियंता अनिल सानप यांच्याकडून राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम 2021 मध्ये पूर्ण झाले असून, आपल्याकडे पूर्णत्वाचा दाखला आहे. राष्ट्रीय पेयजल योजना एका ठिकाणी, तर जलजीवन अंतर्गत नवीन योजना वेगळ्या ठिकाणी हाती घेतल्याचा दावा केला जात आहे. मात्र, 3 फेब्रुवारी 2021 रोजी तत्कालीन उपअभियंता देशमुख यांचा चौकशी अहवाल सानप यांच्या दाव्याला छेद देणारा आहे. आल्हणवाडी येथे प्रत्यक्ष कामाची पाहणी केल्यानंतर जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचा दावा फोल ठरत आहे. पेयजल योजना पन्नास टक्केसुद्धा पूर्ण झाली नसून, अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.

राष्ट्रीय पेयजल योजना पन्नास लाख रुपये खर्चून आल्हणवाडी गावठाणसह खांडगेवस्ती ,फुंदेवस्ती, भुकनवस्ती,वाघदरा, महालदरा, गव्हाणे वस्ती यासाठी सन 2014-15 मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली होती .आजपर्यंत या योजनेतून नागरिकांना एक थेंबही पाणी मिळाले नाही. या योजनेतून स्वतंत्र विहीर खोदली नसून जुनेच उद्भव व वीजपंप योजनेत नव्याने दाखविण्यात आले आहेत. खांडगे वस्तीवरील टाकी बांधताना संबंधित जागा मालकाची बक्षीस पत्र किंवा संमती पत्र घेण्यात आले नाही. गावठाणचे विहिरीपासून टाकीपर्यंत कमी दर्जाची पाईपलाईन करण्यात आली. मात्र, विहिरीवर वीजपंप बसविलेला नाही. टाकीलाही कनेक्शन जोडलेले नाही. पाणीपुरवठा लाईन अर्धवट अवस्थेत टाकली असून, लोकांना नळ कनेक्शन देण्यात आले नाहीत. अनेक वर्षांपासून भंगलेल्या अवस्थेत टाकी असल्याने शेजारील शेतकर्‍यांनी टाकीची कचराकुंडी बनविली आहे. शेजारील फुंदे वस्तीलाही याच टाकीतून पाणीपुरवठा होत असल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आले आहे. भुकनवस्तीवर तर चक्क पाण्याची टाकीही बांधली नाही.

जुनी पाईपलाईन दाखविली नवीन

वाघदरा येथे निकृष्ट दर्जाची छोटी पाण्याची टाकी बांधली. त्यासाठी जुनीच पाईपलाईन नव्याने दाखविण्यात आली. मुळात थातूरमातूर काम करून या योजनेचा निधी हडप करण्यात आला आहे. या योजनेसंदर्भात शासनाच्या चौकशी अहवालातून अनेक धक्कादायक बाबी आणि त्रुटी आढळून आल्या आहेत. असे असताना संबंधित अधिकार्‍यांवर ठोस कारवाई अद्याप झाली नाही.

कारवाईच्या मागणीकडे दुर्लक्ष

राष्ट्रीय पेयजल योजनेची कामे पूर्ण झाल्याशिवाय जलजीवन योजनेचे काम सुरू करू नये, राष्ट्रीय पेयजल योजनेच्या कामाची चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून वेळोवेळी करण्यात आली.

चौकशी अहवाल धक्कादायक

तत्कालीन उपाभियंता देशमुख यांनी फेब्रुवारी 2021 मध्ये संबंधित कामाची चौकशी करून गटविकास अधिकार्‍यांना दिलेला अहवाल धक्कादायक आहे. देशमुख यांनी दिलेल्या चौकशी अहवालात राष्ट्रीय पेयजल योजनेची कामे अत्यंत निकृष्ट व अर्धवट असल्याचा अहवाल देण्यात आला होता. त्यात अंदाजपत्रकानुसार कामकाज करण्यात आले नसल्याची स्पष्टपणे म्हटले होते. या अहवालाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून यातील दोषींना पाठीशी घालण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT