कैलास शिंदे
तालुक्यातील अनेक गावांत बहुतांश सिंचन प्रकल्प, विहीर, बोअरवेल मोठ्या प्रमाणात भरल्याने उसाच्या क्षेत्रात मोठी वाढ होत आहे. सध्या शेतशिवारात ऊस लागवडीच्या कामाला वेग आला आहे. अनेक शेतकरी सहकुटुंब उसाची लागवड करताना दिसत आहेत.
तालुक्यातील बेलपिंपळगाव, पुनतगाव, पाचेगाव, आदी गावांत यावर्षी वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला. त्यामुळे सिंचन क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. मुळा धरणात मुबलक पाणीसाठा झाला आहे. शिवाय विंधन विहीर व विहिरीच्या पाणी पातळीतील मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सध्या सिंचन सुविधा उपलब्ध असलेले शेतकरी ऊस लावणीच्या कामाला प्राधान्य देत आहेत. उसाच्या नवनवीन प्रजातीची माहिती घेत उशिरा पक्व होणार्या व अधिक उत्पादन देणार्या उसाची लागवड करण्याकडे शेतकर्यांचा कल आहे.
नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात ऊस लागवड झाल्यास वेळेत कारखाना तोड होऊन उत्पादन अधिक निघण्यास मदत होते. त्यामुळे शेतकरी ऊस लागवडीची लगबग करीत आहेत. गेल्या चार दिवसांत परिसरात 9 ते 10 अंश सेल्सिअस पहाटचे तापमान राहत आहे. उसाची लवकर उगवण होण्यासाठी तापमान 20 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त अपेक्षित असते. त्यामुळे घटलेल्या तापमानामुळे उसाची उगवण उशिरा होण्याची शक्यता आहे. बदलत्या स्थितीमध्ये भाजीपाला पिकावर होणारा रोगांचा प्रादुर्भाव, गारपीट, अवकाळी पाऊस यासह विविध नैसर्गिक आपत्तींमुळे अन्य पिकांऐवजी ऊस पीक शेतकर्यांसाठी सुरक्षित अन् आश्वासक आहे. एकदा लागवड केली की हमखास उत्पादन निघण्याची हमी असल्यामुळे सिंचन सुविधा उपलब्ध असणारे शेतकरी उसाला पहिली पसंती देतात. त्यातून सध्या परिसरात उसाच्या क्षेत्रात मोठी वाढ होताना दिसत आहे. ऊस हमखास उत्पादन देणारे पीक म्हणून बघितले जाते. मजुरांअभावी शेतकरी हैराण झाले आहेत. लागवडीला भाव वाढला आहे, तरीही मजुरांसाठी मिन्नतवारी करावी लागत असल्याने घरच्या महिलांसह लहान मुलांनाही ऊस लागवडीच्या कामाला न्यावे लागत आहे.
कपाशीच्या बाजारभावात गेल्या दोन वर्षांत सतत घट होत आहे. सध्या बाजारात हमीभावापेक्षा कमी 7 हजार रुपये विक्री होत आहे. त्यामुळे ज्या शेतकर्यांकडे सिंचन सुविधा उपलब्ध आहेत, त्यांनी ऊस लावणीचा पर्याय निवडला आहे. एकरी 50 टनापर्यंत ही उत्पादन निघाले, तरी मागील वर्षाच्या दराप्रमाणे एक लाख 35 हजार रुपये उसातून उत्पादन निघते. एकरी 50 हजार रुपयांपर्यंत खर्च झाला, तरी हमखास उत्पादन निघत असल्यामुळे शेतकरी ऊस शेतीला प्राधान्य देत आहेत.
ऊस लागवडीसाठी मोठा खर्च, कपाशी काढणीनंतर शेतीची नांगरणी, पाळी, रोटाव्हेटर करून सरी काढणे, ऊस लावण्यासाठी बेण्याचा खर्च, मजूर यावर मोठा खर्च करावा लागत आहे. लागवडीपूर्वीची मशागतीसाठी 5 हजार 200 रुपये, खताचा डोस 7 हजार रुपये, लावण्यासाठी प्रतिएकर 6 हजार रुपये, तर 10 हजार रुपयांचे बेणे असा एकत्रित 28 हजार 200 रुपयांपर्यंत प्रतिएकर खर्च येत आहे.रंगनाथ शेजूळ, शेतकरी, गोंडेगाव