कर्जत: तालुक्यातील कोरेगाव येथील लिंगायत समाजाच्या दुर्दैवी वास्तवावर मंगळवारी एका मृत्यूने प्रकाश टाकला. गावातील लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीवर सुरू असलेल्या वादामुळे, श्याम शेटे यांच्या मृतदेहावर अंत्यविधीसाठी तब्बल दोन ते अडीच तास प्रतीक्षा करावी लागली. या वादामुळे मृतदेह तसाच ठेवल्याची दुर्दैवी वेळ समाजावर आली.
याबाबत घडलेली घटना अशी, की कोरेगाव येथे लिंगायत समाजाची स्मशानभूमी असून ते गेल्या शंभर वर्षांपासून या ठिकाणी दफनविधी करतात. मात्र स्मशानभूमीच्या शेजारी असणार्या काही व्यक्तींनी स्मशानभूमीची जागा ही आमची खासगी जमीन आहे असा दावा केला आहे. (Ahilyanagar News update)
यामुळे मागील अनेक दिवसांपासून स्मशानभूमीचा वाद निर्माण झाला आहे. लिंगायत समाजाच्या वतीने तहसील कार्यालयाच्या परिसरामध्ये स्मशानभूमीच्या जागेबाबत यापूर्वी आंदोलनदेखील करण्यात आले होते.
दरम्यान, श्याम मनोहर शेटे यांचे सोमवारी रात्री सव्वाअकरा वाजता निधन झाले. त्यानंतर त्यांचा मृतदेह लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीमध्ये अंत्यविधीसाठी मंगळवारी सकाळी 11 वाजता आणण्यात आला. मात्र स्थानिक पातळीवर काही जणांनी स्मशानभूमीतील प्रवेशास विरोध दर्शवल्यामुळे हे संकट उभे राहिले. परिणामी, मृताच्या नातेवाइकांना व समाजबांधवांना प्रचंड मानसिक यातना सहन कराव्या लागल्या. वातावरणामध्ये तणावही निर्माण झाला होता.
घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव आणि तहसीलदार गुरू बिराजदार हे पोलिस बंदोबस्त घेऊन घटनास्थळी दाखल झाले. यानंतर त्यांनी विरोध करणार्या नागरिकांशी चर्चा केली, तर लिंगायत समाजाच्या वतीने स्मशानभूमी त्यांची असल्याबाबत प्रशासनाला सर्व पुरावे देण्यात आले.
पोलिस निरीक्षक जाधव यांनी यावेळी कणखर भूमिका घेत विरोध करणार्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला. तहसीलदार गुरु बिराजदार यांनीदेखील याच ठिकाणी अंत्यसंस्कार होतील अशी ठाम भूमिका घेतली.
सरपंच युवराज शेळके, यांच्यासह काही स्थानिक लोकप्रतिनिधींनी लिंगायत समाजाच्या बाजूने भूमिका घेतली. पोलिस बंदोबस्तात अखेर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी परिसरात तणावाचे वातावरण होते, मात्र प्रशासनाच्या हस्तक्षेपामुळे अनुचित प्रकार टळला.
लिंगायत समाजातील लोकांनी या प्रकाराचा तीव्र निषेध व्यक्त केला असून, स्मशानभूमीचा कायमस्वरूपी प्रश्न सोडवण्याची मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे. मृत व्यक्तीच्या नातेवाइकांनीही शासनाकडे न्याय मिळवण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
ही घटना केवळ एका समाजाच्या हक्काचा प्रश्न नसून, माणुसकीच्या पातळीवर अंत्यसंस्कारासाठीही संघर्ष करावा लागतोय, हे या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले आहे.