टाकळी ढोकेश्वर/कान्हूरपठार: ज्यांना तुम्ही डोक्यावर घेतलं त्यांचा आवाज निघू शकत नाही. त्यांचा खर्चपाणी पुण्यातून चालतोय ते तुम्हाला काय पाणी देणार? असा सवाल करतानाच ज्यांचं अस्तित्व पुणे जिल्ह्यामुळे आहे ते तुमच्या मुलांना भविष्य देऊ शकतात का? हा विचार आगामी तुम्ही करावा एवढीच माफक अपेक्षा, असे परखड टिकास्त्र डॉ. सुजय विखे पाटील यांनी नामोल्लेख टाळत खासदार निलेश लंके यांच्यावर सोडले.
कान्हूरपठार उपसा जलसिंचन योजनेच्या सर्वेक्षणाचा शुभारंभ तसेच वडगाव दर्या पर्यटन स्थळ विकास कामांच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. पठारावरील वडगाव दर्या निसर्ग पर्यटन केंद्रासाठी 9 कोटी निधी मिळाला असून त्यातील पावणेदोन कोटीच्या कामांचे लोकार्पण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कान्हूरपठार येथे दिलेल्या आश्वासनानुसार पारनेरच्या अवर्षणग्रस्त भागाला सिंचनाचे पाणी देण्याच्या दृष्टीने सर्वेक्षणाचा प्रारंभ तसेच मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2 योजनेअंतर्गत किन्ही येथे सौर प्रकल्पाचे भूमिपूजन डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
डॉ. विखे म्हणाले, ज्यांना निवडून दिले त्यांचा पाणी प्रश्नावर अभ्यास होता का? एकदा विचारून पहा, राजकारणामध्ये हुशार होणं फार चुकीचं आहे. लोकसभेच्या पराभवानंतर स्वतःला एकच प्रश्न विचारला, उगाच डिगर्या घेतल्या, लोक अशीच डॉक्टर होऊन गेले.
बारा वर्षे शिक्षण घेतलं तेव्हा डिग्री मिळाली, इथे एका महिन्यात डिग्री, हे फक्त पारनेर तालुक्यात होऊ शकतं. पराभवानंतर हसणार्यांना सिस्पेसारखा घोटाळा मिळाला. पारनेर तालुक्यातील जनतेचे पैसे सिस्पेमध्ये गुंतले, त्याचे उत्तर कोण देणार असा प्रश्नच डॉ. सुजय विखे पाटील यांनी खासदार लंके यांना जाहीर सभेतून नाव न घेता विचारला.
पाण्याचा प्रत्येक नारळ पश्चिम भागातल्या मंत्र्यांने फोडल्याने कान्हूरपठार भागाला पाणी मिळाले नाही. कोणावर टीका करत नाही, मात्र पाण्याचा संघर्ष पुणे विरुद्ध अहिल्यानगर असा आहे. कोणा परिवाराचे नाव घेऊ शकत नाही, परंतू हा संघर्ष शरद पवार विरुद्ध स्व. बाळासाहेब विखे पाटील असा आहे.
त्यामुळेच पठार भाग पाण्यापासून वंचित राहिला आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या कोणत्याही नेत्याने अहिल्यानगरला पाणी येऊ दिले नाही, ही खरी कुकडी कालव्याची वास्तविकता आहे. अहिल्यानगर सुजलम सुफलम होऊ नये ही संकल्पना पुणे जिल्ह्यातील लोकांची होती म्हणून अहिल्यानगर पाण्यापासून वंचित राहिलं ही वास्तविकता आहे, असे स्पष्ट व बेधडक मत माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले. पुणे जिल्ह्याशी लढाईचं असेल तर ती धमक फक्त विखे कुटुंबामध्येच असल्याचेही ते म्हणाले.
पारनेर तालुक्याच्या पठार भागाचा पाणी प्रश्न फक्त जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार सुजय विखे पाटीलच सोडवू शकतात. त्यांच्या माध्यमातून हा प्रश्न आता मार्गी लागणार आहे. पठार भागावरील शेतकरी, कष्टकरी जनतेच्या हिताचा प्रश्न आता सुटणार आहे.- काशिनाथ दाते, आमदार.
मला निवडणुकीमध्ये तिकीट नको, माझ्या पठार भागावरील जनतेला पाणी द्या, मी विकासाचे राजकारण करतो. पारनेर तालुक्यात अनेक पाण्याचे प्रश्न सोडवले. मंत्री राधाकृष्ण विखे आणि सुजय विखे पाटील यांना पठाराचा पाणी प्रश्न तडीस लागत नाही तोपर्यंत सोडणार नाही. त्यांच्याकडून पठार भागाला पाणीच मिळवून घेणार.- विश्वनाथ कोरडे, भाजप प्रदेश सदस्य