शिर्डी : उन्हाचा चटका बसू लागल्याने शिर्डीतील भक्तांच्या घटत्या संख्येने व्यवसाय मंदावले असतानाच साई मंदिर परिसरातील श्वान निवांतपणे पहुडल्याचे चित्र आहे. श्रद्धेपोटी भक्तांकडून मिळणारे बुंदीचे लाडू, पेढे, बिस्किटे आणि दुधाचा अतिरेकी आहार भाविकांकडून मिळत असल्याने या श्वानांना मधुमेह झाल्याचे निष्पन्न झाले आहे. अनेक श्वानांचे केस गळाले असून, पोटात जंतू झाल्याने ते आजारी पडत आहेत. सतत गोड पदार्थ सेवनाने श्वानांमध्ये लट्टपणाही दिसून येत आहे.
श्री साईबाबांच्या समाधीवर नतमस्तक होण्यासाठी वर्षभरात कोट्यवधी भाविक शिर्डीत येतात. त्यातील काही भाविक दानपेटीत दान टाकतात, तर काही अन्नदान करतात. काहीचे लक्ष मुक्या प्राण्यांकडेही जाते. साईबाबांवरील श्रद्धेपोटी ते श्वानांच्या मुखी प्रसाद म्हणून गोड पदार्थ भरवतात. सतत मिळणारे भरपेट गोडधोड खाण्याने मंदिराच्या दीड किलोमीटर परिघातील श्वान धष्टपुष्ट झाले आहेत. त्यांचे वजन वाढल्याने लठ्ठपणा अंगी आला आहे. हे श्वान कायम एका ठिकाणी पहुडल्याचे चित्र आहे. तथापि, दोन किलोमीटर परिघाबाहेरील श्वान मात्र तरतरीत असल्याचा विरोधाभास याच शिर्डीत दिसून येतो.
एकाच वेळ पाच ते सहा पिल्लांना जन्म देणार्या श्वानांमुळे शिर्डीतील श्वानांची संख्याही वाढली आहे. काही दिवसांपूर्वी पशुवैद्यकीय विभागाने श्वान पकडून त्यांची नसबंदी केली होती. मात्र मनुष्यबळाअभावी आता हे करणे शक्य नसल्याची बाबही समोर आली आहे. जे लोक उपचारासाठी श्वान घेऊन पशुवैद्यकीय अधिकार्यांकडे जातात, त्यांच्यावर उपचार केले जाते. मात्र, भटक्यांना कोण घेऊन जाणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सतत गोडधोड खात असलेल्या श्वानांना दुसरा कोणताच पदार्थ चव देत नाही. गोडशिवाय टाकला तरी ते त्याला तोंडही लावत नाहीत. किलोच्या पटीत गोड पदार्थ खाणारे श्वान सुस्तावल्याने त्यांची प्रतिकार क्षमताही क्षीण झाल्याचे दिसून आले. भक्ताने जवळ येत पाठीवरून हात फिरवला तरी ते काहीच नाहीत. श्रद्धेपोटी भाविक किलोच्या पटीत गोड पदार्थ श्वानांच्या मुखी भरवतात.
श्वानांवर उपचार करतो. मनुष्यबळाच्या अभावामुळे बाहेर जाऊ शकत नाही. सेवाभावी संघटना पुढे आल्या तर मधुमेह, निद्रानाश झालेल्या श्वानांवर उपचार शक्य आहेत. भाविकांनी श्वानांना गोडधोड खाऊ घालू नये. त्याद़ृष्टीने प्रबोधन करणे गरजेचे आहे.डॉ. सुशील कोळपे, पशुवैद्यकीय अधिकारी