नगर : खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील प्रत्येक शेतकर्याला पीककर्ज मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनातील अधिकारी व बँकांनी समन्वयाने काम करावे. क्षुल्लक कारणांवरून कर्जाचे प्रस्ताव नाकारु नका. पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण होईल, यादृष्टिने काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी राष्ट्रीयीकृत व सहकारी बँकांच्या अधिकार्यांना दिले.
जिल्हास्तरीय बँकर्स समितीची आढावा बैठक गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. आशिया बोलत होते. यावेळी आरबीआयचे प्रतिनिधी राजेंद्र कनिशेट्टी, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी आशिष नवले, नाबार्डचे विक्रम पठारे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक बालाजी बिराजदार, ग्रामोद्योग अधिकारी बालाजी मुंडे, जिल्हा अभियान व्यवस्थापक सोमनाथ जगताप, पर्यटन संचालनालयाच्या प्रकल्प अधिकारी गायत्री साळुंके आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले, प्रत्येक गरजू व पात्र शेतकर्याला पीककर्ज मिळावे यासाठी कृषी विभाग, ग्रामसेवक तसेच तालुकास्तरीय अधिकार्यांच्या सहकार्यातून बँकांनी ग्रामीण पातळीवर कँपचे आयोजन करावे. क्षुल्लक कारणांवरून कर्जाचे प्रस्ताव नाकारण्यात येऊ नयेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
विविध शासकीय योजनांच्या कर्जांची प्रकरणे बँकांकडे संबंधित विभागामार्फत पाठविण्यात येतात. अशी कर्ज प्रकरणे मंजूर करण्याच्या प्रक्रियेमध्ये विलंब होणार नाही याची दक्षता घ्यावी, ई-पिंक रिक्षांसाठी मंजूर लाभार्थ्यांना तत्काळ निधीचे वितरण करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी दिल्या.
पर्यटन क्षेत्रात महिलांमध्ये उद्योजकता आणि नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी व महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘आई’ महिला केंद्रीत पर्यटन धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी केल्या. यावेळी ‘जिल्हा पत आराखडा 2025’चे विमोचन करण्यात आले.