संतश्रेष्ठ निंबराज महाराज विद्याधाम प्रशालेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा  Pudhari
अहिल्यानगर

Devdaithan Old Students Reunion: वयोवृद्ध विद्यार्थ्यांची 50 वर्षांनी भरली शाळा...

संतश्रेष्ठ निंबराज महाराज विद्याधाम प्रशालेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा

पुढारी वृत्तसेवा

देवदैठण : पिकलेले पांढरे केस... डोळ्यावर जाड भिंगाचा चष्मा... ऐकू येण्यासाठी कानात यंत्र... कुणाच्या हातात आधाराला काठी... कुणाच्या डोक्यावर टोपी तर कुणी कंबरेत वाकलेले असे वयाची सत्तरी गाठलेले 60-70 ज्येष्ठ एकत्र आले. ते काही शासनाच्या कुठल्या लाभासाठी नाही, तर निमित्त होते शालेय मित्रांच्या तब्बल पन्नास वर्षांनी आयोजित केलेल्या स्नेह मेळाव्याचे.(Latest Ahilyanagar News)

शाळा, कॉलेजचे दिवस संपले की, प्रत्येक जण आपापल्या करिअरसाठी वेगवेगळ्या क्षेत्राकडे धाव घेतो. आपल्या कुटुंबात रममाण होतो. मात्र, ज्या शाळेमध्ये आपण शिकलो, लहानाचे मोठे झालो, वेगवेगळ्या भागातील विद्यार्थ्यांबरोबर मैत्रीचे नाते जोडले, ती नाळ मात्र तशीच असते. त्यामुळे मागे वळून पाहताना सर्वांना एकदा भेटावे, एकमेकांशी हितगुज करावे या ओढीने देवदैठण (ता. श्रीगोंदा) येथे रविवारी (दि. 9) संतश्रेष्ठ निंबराज महाराज विद्याधाम प्रशालेच्या 1973, 1974 आणि 1975 सालच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा तब्बल 50हून अधिक वर्षांनंतर स्नेहमेळावा पार पडला.

सामाजिक कार्यकर्ते विलास वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली आणि श्रीराम बडवे, बाबूराव नायकवाडी, भाऊसाहेब कौठाळे, पांडुरंग वेताळ, बबन बनकर, द्रोपदा मेंगवडे (कुताळ), यशोदा मेंगवडे (शिरोळे) आदी त्या वेळच्या शिक्षकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमात आपापल्या क्षेत्रात निवृत्त झालेल्या जवळजवळ सर्वच विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शवली. सुरुवातीला दिवंगत झालेल्या वर्गमित्रांना सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सर्वच ज्येष्ठ विद्यार्थ्यांनी आपापल्या मनोगतातून परिचय व गमती-जमती सांगताना त्यावेळेस व आजच्या काळात गाव आणि शाळेत झालेल्या बदलाविषयी बोलताना जुन्या आठवणींना उजाळा दिला. या वेळी कोण बोलतंय म्हणून उपस्थितांतून अनेकजण चष्म्याच्या काचा पुसून पाहत होता, तर झालेल्या विनोदावर एखाद दुसरा हसला की काही ते हसतायत म्हणून उगाचच हसताना आपल्याला ऐकू येत नाही हे लपविण्याचा प्रयत्न करत होते. कुणी बोलायला उठताना दुसऱ्याचा आधार घेत होते, तर कुणी आठवून आठवून बोलत होते. अनेकजण दुपारची औषधे वा गोळी खाण्याचा टाईम झाला म्हणून किती वाजले हे पाहताना सारखं सारखं घड्याळ बघत होते. अशा एक ना अनेक गमतीदार किस्स्यांनी वयोवृद्ध विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा पार पडला. समारोपप्रसंगी जेवतानाही अनेकजण शुगर शुगर म्हणत गोड खाणे टाळत होते. तर अनेकजण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खाण्यातील पथ्य पाळत जेवण करताना दिसत होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विश्वनाथ खेडकर, कोंडीभाऊ भालेकर, बबन वाघमारे, नारायण कोकाटे, मारुती ढवळे, नामदेव वाघमारे आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन जनार्दन बनकर यांनी, तर प्रास्ताविक नानासाहेब गायकवाड यांनी केले. गुलाबराव अलभर यांनी शतायुषी व्हा अन्‌‍ पुन्हा भेटू म्हणत आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT