गोरक्ष शेजूळ
नगर: कधीकाळी शांतताप्रिय समजला जाणारा नगर जिल्हा दिवसेंदिवस ‘क्राईम हब’ म्हणून पुढे येत आहे. गावठी कट्टे तर येथे उदंड झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी नगर शहर आणि जामखेडमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनांनी हे अधोरेखित केले.
विशेष म्हणजे दीड वर्षाच्या काळात नगरमध्ये तब्बल 80 गावठी कट्टे आणि त्यासोबत 135 जिवंत काडतुसे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने हस्तगत केले आहेत. गावठी कट्ट्यांचा गुन्ह्यांमध्ये वाढता वापर पाहता जणू नगरमध्ये कायदा व सुव्यवस्थेचाच गुन्हेगारांकडून ‘एन्काऊंटर’ सुरू असल्याचे चित्र आहे. (Latest Ahilyanagar News)
परराज्यात स्वस्तात मिळणार्या गावठी कट्ट्यांचा नगरमध्ये अक्षरशः खेळण्याप्रमाणे वापर होत आहे. साध्या साध्या आणि किरकोळ वादातूनही गावठी कट्ट्याची दहशत माजवली जात आहे. यातून गोळीबाराच्या घटनाही नव्या नाहीत. जबरी चोर्या, लूटमार, दरोडे, खून अशा अनेक घटनांमध्ये गावठी कट्ट्यांचा वापर दिसलेला आहे.
याशिवाय अनेक वाळू तस्करांच्या कमेरालाही कट्टे असल्याचे लपून नाही. त्यामुळे वाळूचाही इतिहास रक्तरंजित झाला आहे. प्रामुख्याने पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेल्या अनेक गुन्हेगारांकडे अधिक प्रमाणात पिस्तूल असून, त्याचाही गँगवॉर, जमिनी खरेदी विक्री व्यवहारात दहशत पसरविण्यासाठी वापर होत असल्याचे दिसले आहे.
नगर जिल्ह्यात गेल्या दीड वर्षात (17 महिन्यांत) सशस्त्र हाणामार्या, लूटमार, खून इत्यादी प्रकारातील 310 घटना नोंद आहेत. या गुन्ह्यांच्या तपासात 80 गावठी कट्टे जप्त आणि 135 जिवंत काडतुसे आरोपींकडून हस्तगत केलेली आहेत. याशिवाय काही गुन्ह्यांमध्ये कोयते, तलवारी व इतर जीवघेण्या शस्त्रांचा वापर करण्यात आला आहे. अशा 242 तलवारी, कोयते पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या सर्व गुन्ह्यांमध्ये एकूण 401 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.
श्रीरामपूर, नेवासा, राहुरीअन् नगरही हिटलिस्टवर?
अवैध शस्त्रे बाळगणार्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई थंडावल्याचे दिसते आहे. त्यामुळे आजही जिल्ह्यात शेकडो गावठी कट्टे असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. यात श्रीरामपूर, नेवासा, राहुरी आणि नगरही हिटलिस्टवर आहेत.