तालुक्यातील आदर्शगाव सुरेशनगर ग्रामपंचायतमध्ये 15व्या वित्त आयोगातून गावाला पाणीपुरवठ्यासाठी असणार्या विहिरीचा गाळ काढणे आणि जाळी बसविण्याच्या नावाखाली न केलेल्या कामाचे चक्क सरपंच, ग्रामसेवक आणि शाखा अभियंत्यासह शिपायाने संगनमत करून प्रत्यक्षात गावात न झालेले काम कागदोपत्री दाखवून एक लाख 72 हजार तीनशे रुपयांचा मोठा भ्रष्टाचार केल्याची लेखी तक्रार ग्रामपंचायत सदस्य विकास उभेदळ यांनी थेट मंत्रालयात केली आहे. आदर्श गावात न झालेल्या कामाची रक्कम पुन्हा ग्रामपंचायत खात्यामध्ये वर्ग करावी आणि न केलेल्या कामांमध्ये बोगस रक्कम वर्ग करणार्या संबंधित दोषी अधिकार्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी सुरेशनगर ग्रामस्थांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत अधिक सविस्तर वृत्त असे की, आदर्शगाव सुरेशनगरच्या लोकनियुक्त सरपंच शैला कल्याण उभेदळ यांनी अख्ख्या गावाला स्वतःच्या विहिरीतून पाणीपुरवठा केल्याचे दाखवून या विहिरीजवळच चक्क ग्रामस्थांना बोलावून घेऊन मोठेपणा करून आपल्या छब्या काही माध्यमातून उमटविल्या. तेच छायाचित्र ग्रामपंचायतीच्या मालकीच्या विहिरीचा गाळ काढणे आणि जाळी बसवणे असे ऑनलाइन पोर्टलला जिओ टॅगिंगद्वारे अपलोड केले. या छायाचित्राद्वारे ग्रामस्थांसमोर काम पूर्ण केल्याचे दाखविण्यात येऊन अधिकार्यांच्या संगनमतातून मोठा आर्थिक गफला केला आहे.
हा प्रकार ग्रामपंचायत सदस्य विकास उभेदळ यांनी सर्व पुराव्यानिशी मंत्रालयात तक्रार केल्यामुळे आता प्रत्यक्षात काम न करता खोटी रक्कम काढण्यात आलेली असताना ही रक्कम पुन्हा ग्रामपंचायत खातेमध्ये जमा करण्याची मागणी केली. त्यामुळे अधिकारी वर्ग प्रचंड अडचणीत सापडला असून, अधिकारी नेमकी काय भूमिका घेतात? याकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे.
या भ्रष्टाचाराबाबत अमृत उभेदळ आणि ग्रामपंचायत सदस्य विकास उभेदळ यांच्यासह ग्रामस्थांनी शासन दरबारी पाठपुरावा करून मोठा भ्रष्टाचार उघड केलेला असून, दोषींवर लवकरात लवकर कारवाई न झाल्यास आंदोलन छेडणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
कामाची मंजुरी 1 लाख 35 हजार 935 रुपये असताना सरकारी तिजोरीतून 1 लाख 72 हजार रुपये देण्यात आले. गावात चौकशीला शाखा अभियंता आले असता त्यांनी प्रत्यक्षात ऑन दी स्पॉट काहीच पाहिलेले नसल्याचे छायाचित्रही त्यांच्याकडे नाहीत आणि सरपंच, ग्रामसेवक आणि शिपाई यांनी साहित्याप्रमाणे मूल्यांकन केले याचे व्हिडिओ चित्रीकरणही ग्रामस्थांकडे असून, ज्याने चोरी केली त्याच अधिकार्याकडे तपास देण्यात आला असून, दुसरा अधिकारी चौकशीस देण्यास पंचायत समिती टाळाटाळ करत असल्याचा आरोप उभेदळ यांच्यासह ग्रामस्थांमधून केला जात आहे. चालू केलेल्या कामाचे माहिती अधिकार फोटो मागितल्यानंतर ते सन 2014-15 आणि 2022चे आढळल्याचे ग्रामपंचायत सदस्य विकास उभेदळ यांनी सांगून या कामाची चौकशी गुण नियंत्रण विभागामार्फत करण्याची मागणी केली.
ग्रामपंचायत सदस्य विकास उभेदळ यांनी मंत्रालयातील कक्ष अधिकार्यांकडे तक्रार दाखल केल्यामुळे मंत्रालय विभागातून याची तत्काळ दखल घेऊन गटविकास अधिकारी यांना सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. गटविकास अधिकार्यांनी आता पंचायत समितीच्या विस्तार अधिकारी आणि पाणीपुरवठा शाखा अभियंत्यांना चौकशीचे आदेश दिल्यामुळे सुरेशनगर गावात न झालेल्या कामाची बिले काढण्यात आल्यामुळे संबंधित अधिकार्यांना ‘बाप दाखव अन्यथा श्राद्ध घाल’ अशी भूमिका पार पाडावी लागणार आहे.