संगमनेर: अहिल्यानगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या 12 शाखाधिकाऱ्यांच्या नुकत्याच बदल्या करण्यात आल्या. या बदल्या पारदर्शीपणे केल्याचे सत्ताधाऱ्यांनी पुर्वीच सांगितले. मात्र ह्या बदल्या कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी न करता, त्यांची गैरसोय करून वेगळ्याच उद्देशासाठी केल्या, असा आरोप करत काही संचालकांसह सभासदांनी संगमनेरच्या शाखेत एकत्र येवून निषेध नोंदवला.
बदल्यात दुरुस्ती न झाल्यास मुख्य शाखेत आंदोलन करण्याचा इशारा संगमनेरचे शाखा अधिकारी यांना निवेदनाव्दारे दिला.दरम्यान, बदल्यांवरून विरोधी गटातील संचालकांनी सत्त्त्ााधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न झाला. तर सत्त्ताधाऱ्यांकडूनही विरोधकांचे हे आंदोलन फार्स असल्याचा आरोप झाला. (Latest Ahilyanagar News)
संगमनेरचे शाखाधिकारी नेवासा या ठिकाणी तर श्रीगोंद्याचे शाखाधिकारी संगमनेर या ठिकाणी टाकलेले आहेत. 90 ते 180 किलोमीटर एवढ्या दूरवर बदल्या करून त्यांची नेमकी कोणती सोय केली याचे आकलन सभासदांना होत नाही. केवळ सात-आठ महिने सेवेचा काळ बाकी असताना तसेच वयाचा व ऑनलाईन पद्धतीने बदल्या करताना कुठल्याही संवर्गाचा विचार न करता सदर निर्णय घेतला गेल्याचा आरोप केला जात आहे.
या बदल्यांबाबत सभासद, संचालक किंवा शाखाधिकारी यांनाही कुठलीही माहिती दिली गेली नाही. इतर कामासाठी बोलवून अचानक बदल्या त्यांच्या माथी मारल्या. ‘ऑनलाइन पद्धतीने बदल्या केल्या,पारदर्शकपणे बदल्या केल्या’ असे सांगत असताना मग संवर्गाचा विचार का झाला नाही?असे प्रश्न आता सभासद सत्ताधाऱ्यांना विचारत आहेत.
यावेळी संगमनेरच्या शाखेत राम हांडे, दत्तात्रय करपे, अक्षय खतोडे, शशिकांत आव्हाड, श्रीकांत बिडवे, गौतम मिसाळ, सोमनाथ गळंगे, संतोष कुलाळ, सोमनाथ घुले आणि शिवाजी दुशिंग या शिक्षक नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अगोदर कर्मचाऱ्यांची गैरसोय करायची आणि नंतर आर्थिक देवाणघेवाण करून पुन्हा सोय करायची अशा प्रकारचा हा डाव असल्याची टीका यावेळी सभासदांकडून करण्यात आली.
दरम्यान, बदल्यांची चूक दुरुस्त न केल्यास लवकरच शिक्षक नेते आर.पी. राहणे, माजी अध्यक्ष किसन खेमनर, राजू राहाणे, डॉ संजय गोर्डे, बाळासाहेब मोरे, गोकुळ कहाणे, बाळासाहेब शेळके, महिला आघाडीच्या सुनीताताई उगले, रमेश डोंगरे, केशवराव घुगे, राजू आव्हाड, अशोक गिरी, अशोक शेटे, संजय आंबरे, बाळासाहेब गुंजाळ, यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन उभे करून बँकेस टाळे ठोकण्याचा इशारा यावेळी शिक्षक प्रतिनिधी आणि सभासदांनी दिला.
लोकशाही नाही ही ‘बापूशाही’: राहिंज
संचालक मंडळाच्या मागील तीन मासिक सभांपासून सत्ताधारी हे विषय क्रमांक 1 ते विषय क्रमांक 25 मंजूर असे सांगून मीटिंग संपवून टाकतात. शंभर किलोमीटर लांब वरून मासिक सभेसाठी जाणाऱ्या संचालकांचा भ्रमनिरास होतो. प्रत्येक विषयावर लोकशाही पद्धतीने चर्चा होऊन निर्णय होणे अपेक्षित असताना ‘बापूशाही’ पद्धतीने सध्या बँकेचा कारभार सुरू आहे, अशी टीका संचालक भाऊराव राहिंज यांनी केली.
बापुंच्या नावाने उगाच ओरडणे सोडा: दळे
शाखाधिकारी कैलास मोरे यांची बदली झाल्याने संगमनेर शाखेत काहींनी आंदोलन केले. शिक्षकांचे इतर प्रश्न असताना आणि बापूसाहेब तांबे यांच्या नेतृत्वात चांगला कारभार सुरू असताना बँकेत असे राजकारण करणे, हे सभासद हिताचे नाही. मुळातच, बँकेच्या इतिहासात पहिल्यांदा बापूंनी ऑनलाईन बदल्या केल्या, याचे कौतुक करण्याऐवजी पोटदुखी आहे. मात्र कोणाची गैरसोय होत असेल, तर त्यांनी तशी लेखी मागणी केली तर नेते सकारात्मक विचार करतील. मात्र काही लोकांकडून उगाच राजकीय शिमगा घातला जात आहे. बापूंच्या नावाने ओरडणे हे न पटणारे आहे. अशी टीका शिक्षक बँकेचे माजी उपाध्यक्ष संतोष दळे यांनी केली.