नगर : अहिल्यानगरमध्ये आजपासून (दि. 29) होणार्या 67 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील विजेत्यास देण्यात येणारी चांदीची आकर्षक गदा परंपरेनुसार पुण्याच्या मोहोळ कुटुंबीयांकडून स्व. मामासाहेब मोहोळ यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेकडे सुपूर्द करण्यात आली. पुण्यातील छोटेखानी सोहळ्यात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधरअण्णा मोहोळ यांच्या वतीने आ. शंकरराव मांडेकर, आ. ज्ञानेश्वर कटके, आ. बापूसाहेब पठारे यांच्या हस्ते ही चांदीची गदा स्पर्धेचे संयोजक आमदार संग्राम जगताप यांच्याकडे देण्यात आली. या वेळी गदेचे विधिवत पूजन करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पै. संदीप भोंडवे, सरचिटणीस हिंद केसरी पै. योगेश दोडके, महाराष्ट्र केसरी भाग्यश्री फंड, पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर, तात्यासाहेब भितांडे, हनुमंतराव गावडे, आप्पा रेनुसे ऑलिम्पिक खेळाडू मारुती अडकर, नरहरी चोरगे, मेघराज कटके, बाबूअण्णा मोहोळ, शिरूर केसरी बालाजी गव्हाणे, अहिल्यानगर कुस्तीगीर संघाचे खजिनदार शिवाजी चव्हाण, सदस्य युवराज करंजुले, शिवाजीराव कराळे, बबन काशीद, उमेश भागानगरे, अनिल गुंजाळ, महेश लोंढे, गोरख खंडागळे, मोहन गुंजाळ, दादा पांडुळे, अजबे, वैभव वाघ व मनोज फुले आदी या वेळी उपस्थित होते.
उंची 27 ते 30 इंच; व्यास 9 ते 10 इंच; वजन 10 ते 12 किलो; अंतर्गत धातू- सागवानी लाकडावर कोरीव काम आणि आकर्षक पिळे, बाह्य धातू- 32 गेज जाड शुद्ध चांदीचा पत्रा. त्यावर कोरीव काम आणि झळाळी. गदेचे बाह्यरूप - मध्यभागी स्व. मामासाहेब मोहोळ यांची वर्तुळाकृती प्रतिमा चांदीच्या कोंदणात बसवलेली आहे. त्याच्या पलीकडच्या बाजूला हनुमानाचे चित्र वर्तुळाकार चांदीच्या कोंदणात बसवलेले आहे.