सोनोग्राफी, गर्भपात केंद्रांवर वॉच; जिल्हाधिकार्‍यांच्या सक्त सूचना File Photo
अहिल्यानगर

Ahilyanagar: सोनोग्राफी, गर्भपात केंद्रांवर वॉच; जिल्हाधिकार्‍यांच्या सक्त सूचना

मुलींचा जन्मदर घटतोय

पुढारी वृत्तसेवा

नगर: मुलींचा घटता जन्मदर वाढविण्यासाठी पालकांमधील जनजागृतीसोबतच जिल्ह्यातील सर्व सोनोग्राफी केंद्र व गर्भपात केंद्रांवरही आता आरोग्य प्रशासनाचा वॉच असणार आहे. त्यासाठी जिल्हास्तरावरून विशेष पथकामार्फत अचानक तपासणी करण्यात येणार असून, संशयीत गर्भपाताबाबतही सखोल चौकशी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी आरोग्य विभागाला दिल्या आहेत. दरम्यान, गर्भपातासाठी वापरण्यात येणारी औषध विक्रीबाबतही अन्न व औषध प्रशासन नियमित तपासणी करणार असल्याचे पुढे आले आहे.

जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील लिंग-गुणोत्तर प्रमाण, साथरोग परिस्थिती, जन्म व मृत्यू नोंदणी व राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला. (Latest Ahilyanagar News)

जिल्हाधिकारी यांनी मुलींच्या घटत्या जन्म दरासोबतच तसेच अन्य काही विषयांवरही सविस्तर आढावा घेऊन आरोग्य विभागाला सूचना केल्या आहेत. यामध्ये गरोदर मातांचा नियमित पाठपुरावा करणे, लिंगगुणोत्तर बाबत जनजागृती करणे, साथरोग परिस्थिती बाबतही त्यांनी सूचना केल्या.

सर्व खाजगी व्यावसायिकांनी डेंग्यू निदान झालेल्या रुग्णांची सविस्तर माहिती शासकीय आरोग्य यंत्रणेला देणे बंधनकारक आहे. साथ रोग नियंत्रणाबाबत योग्य ती कार्यवाही करण्यासाठी ही माहिती गरजेची असते.

मात्र कर्तव्यात कसूर केल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे, जन्म मृत्यूची घटना ज्या कार्यक्षेत्रात होईल त्याच कार्यक्षेत्रात जन्म मृत्यू नोंदणी करणे कायद्याने बंधनकारक असून, ज्या रुग्णालयामध्ये जन्म मृत्यू होईल त्या वैद्यकीय व्यावसायिकांनीच या घटनांची नोंद करणे व अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

याशिवाय यात हलगर्जीपणा केल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. क्षयरोग निर्मुलन कार्यक्रम अंतर्गत क्षय रुग्णाबाबत माहिती शासकीय यंत्रणेला देणे बंधनकारक असून त्या नुसार सर्व खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांनी मार्गदर्शक सूचनांनुसार क्षयरोग रुग्णांवर उपचार करणे व अहवाल सादर करणे आवश्यक असल्याचेही जिल्हाधिकार्‍यांनी नमूद केले.

जिल्ह्यातील एकूणच आरोग्य व्यवस्थेबाबत डॉ. नागरगोजे व डॉ. घोगरे यांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासमोर सविस्तर माहिती मांडली.

सन 2024-25 मधील आलेख

मुले जन्म - 32901

मुली जन्म - 30154

मुली कमी - 2747

लिंग गुणोत्तर प्रमाण - 917

जिल्ह्यातील लिंग गुणोत्तर सुधारणे, साथरोगांना आळा घालणे व जन्म मृत्यू नोंदणी विहित मुदतीमध्ये करणेसाठी शासकीय यंत्रणा स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी वैद्यकीय व्यावसायिक, स्वयंसेवी संस्था व नागरिक यांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक असल्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. आशिया तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी केल्या आहेत.
- डॉ. बापूसाहेब नागरगोजे, जिल्हा आरोग्य अधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT