आश्वी : शेतातील गिनी गवत कापण्यासाठी गेलेल्या दोन मुलांना पायालगत घोटाळणारे पिल्लू आढळले. मांजरीचे पिल्लू आहे, असे त्यांना वाटले, परंतू बराच वेळ त्यांनी, बारिक निरीक्षण केल्यानंतर ते मांजरी पिल्लू नव्हे, तर चक्क बिबट्याचा छोटा बछडा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. क्षणार्धात भितीने थर-थर कापत मुलांनी तेथून पळ काढला. केवळ नशिब बलवत्तर म्हणून त्यांच्यावरील हल्ला टळला. कारण तेथे योगायोगाने मादी बिबट्या नव्हता! संगमनेर तालुक्यातील पिंप्री लौकी अजमपूर व पानोडीच्या शिवावरील बोंद्रे वस्तीवरील शेतात ही अनोखी घटना घडली.
दरम्यान, गिणी गवतात चक्क बिबट्याचा छोटा बछडा आढळल्याने या परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पानोडी - पिंप्री लौकी अजमपूर या मधल्या रस्त्यालगत शिवाजी मारुती बोंद्रे यांच्या वस्तीशेजारी ओढ्याच्या बाजूला अशोक बोंद्रे यांचे शेत आहे. या घटनेबाबत शिवाजी बोंद्रे यांनी, पत्रकार राजेश गायकवाड यांच्यामार्फत वनाधिकारी राम मंडपे यांना माहिती दिली. घटनास्थळी वनखात्याचे देवीदास चौधरी , सुखदेव सुळ व संजय गागरे या सर्वांनी भेट दिल्यानंतर त्यांना बिबट्याचा छोटा बछडा आढळला. त्या बछड्याला त्यांनी घरापासून दूर सुरक्षित जागी नेवून ठेवले, मात्र रात्री पुन्हा मादी बिबट्या तेथे आला. तिने बछड्याला पुन्हा पहिल्या ठिकाणी नेले. या हालचालींकडे लक्ष्य ठेवून असलेले बोंद्रे यांनी, वन अधिकार्यांना पुन्हा माहिती दिली. वन सहाय्यक मंडपे हे वन कर्मचार्यांसह तातडीने घटनास्थळी पोहचले. बिबट्याचा छोटा बछडा त्यांना आढळला. तो दीड महिन्याचा आहे, मात्र तेथे आणखी दोन बछड्यांसह मादी बिबट्याचा संचार असण्याची शक्यता वनाधिकार्यांनी वर्तविली आहे.
पानोडी, पिंप्री लौकी अजमपूर परिसरात बिबट्यांनी मोठी दहशत निर्माण केल्याचे वास्तव चित्र दिसत आहे. थोरात विद्यालयाचे प्रांगण व शिबलापूर - पानोडी रस्त्यावर अनेकांना बिबट्याने दर्शन दिल्याची चर्चा झडत आहे.