Child road accident news
नगर तालुका: घरासमोर खेळत असलेल्या 7 वर्षांच्या बालकाला भरधाव कारने जोरात धडक दिली. या अपघातात बालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना पोखर्डी (ता. नगर) येथे पिंपळगाव उज्जैनी जाणार्या रस्त्याकडेला शुक्रवारी (दि. 8) सायंकाळी 5.30च्या सुमारास घडली.
अथर्व सुसे (वय 7, रा. पोखर्डी, ता. नगर) असे मृत बालकाचे नाव आहे. राजेंद्र भाऊराव सुसे (वय 41, रा. पोखर्डी, ता. नगर) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. राजेंद्र यांचा पुतण्या अथर्व हा घरासमोरील गणपती मंदिराजवळ खेळत होता. (Latest Ahilyanagar News)
त्याच वेळी पोखर्डी ते पिंपळगाव उज्जैनी रस्त्याने भरधाव जाणार्या कारने (एमएच 16 बीएच 2271) अथर्व याला पाठीमागून जोरात धडक दिली. धडकेनंतर चालक पोपट कुंडलिक वाघ (रा. पिंपळगाव उज्जैनी) तेथून पळून गेला. या धडकेत अथर्वचा जागीच मृत्यू झाला. नागरिकांनी अथर्व यास त्वरित जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु तेथील डॉक्टरांनी त्यास औषधोपचारापूर्वीच मृत झाल्याचे घोषित केले. राजेंद्र सुसे यांच्या फिर्यादीवरून कारचालक पोपट वाघ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.