मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेला सहा महिन्यांचा कालावधी उलटून देखील यात सहभागी असलेल्या बेरोजगार तरुणांना अद्यापही या योजनेचे मानधन मिळालेले नाही. या मानधना संदर्भात प्रांताधिकार्यांमार्फत मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना छात्र भारतीय संघटनेच्यावतीने निवेदन पाठविण्यात आले आहे. सहभागी बेरोजगार तरुणांना मानधन न मिळाल्यास छात्र भारती संघटनेच्यावतीने राज्यभर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
युवा वर्गाचे शिक्षण पूर्ण झाल्यांनतर वेळेत योग्य मार्गदर्शन आणि व्यवसाय करणार्यांसाठी भांडवल उपलब्धता, शासन विविध योजनांच्या माध्यमातून करून देत आहे. रोजगार इच्छुक युवक-युवती आणि रोजगार देणार्या विविध आस्थापना यांच्यामध्ये संवाद आणि समन्वय साधून उद्योग क्षेत्राला आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ आणि युवा वर्गाला रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ सुरू केली आहे. ऑगस्टमध्ये निवडणुकी अगोदर सरकारने तरुणांसाठी मुख्यमंत्री प्रशिक्षण योजना सुरू केली होती.
या योजनेत बारावी उत्तीर्ण, आय.टी.आय., पदविका, पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या युवकांना प्रशिक्षणाअंती रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याबरोबरच या योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थीना 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सहा हजार रुपये, आयटीआय व पदविकाधारक विद्यार्थ्यांना आठ हजार तर पदवीधर, पदव्युत्तर विद्यार्थ्यांना 10 हजार रुपये विद्यावेतन दरमहा डीबीटी पद्धतीने मिळणार होते. मात्र अजुन मानधन मिळालेले नाही.
मात्र निवडणूक झाल्यानंतर सरकारने या योजनेत सहभागी असलेल्या तरुणांकडे थेट दुर्लक्ष केले आहे. योजनेच्या माध्यमातून राज्यभरात दीड लाख बेरोजगार वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आहे. मात्र सहा महिन्यांचा कालावधी उलटून देखील राज्यातील लाखो तरुणांना अजूनही या योजनेचे विद्या वेतन मिळू शकलेले नाही. विद्या वेतन मिळेल की नाही याची देखील शाश्वती राहिलेली नाही. सरकारने निवडणुकीच्या मतांसाठी प्रलोभाने दाखवून तरुणांची मते मिळविण्यासाठी हा डाव आखल्याचा आरोप छात्र भारतीचे अनिकेत घुले यांनी केला आहे.
योजनेतील सहभागी बेरोजगार युवक हे गरीब घरातील आहे. हाताला काम नाही म्हणून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या मार्फत संधी शोधण्याचा प्रयत्न करत आहे. पुढे या तरुणांना आपण काय काम देणार यांचा सरकारने कुठलाही खुलासा केला नाही. सरकारने मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्य योजनेत काम केलेल्या तरुणाच्या खात्यावर त्याच्या कष्टाचे पैसे द्यावेत, अन्यथा छात्रभारतीच्या वतीने महाराष्ट्रभर ठिय्या आंदोलन करण्यात येईल.अनिकेत घुले, राज्य कार्याध्यक्ष छात्र भारती