पाथर्डी : अतिवृष्टीमुळे वाहून गेलेल्या पुलामुळे वाळुंज गावाचा तालुक्याशी संपर्क तुटला होता. गावकऱ्यांना दैनंदिन गरजा भागवताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. मात्र, संकटाच्या या काळात चैतन्य फाउंडेशनने पुढाकार घेत गावकऱ्यांच्या सहकार्याने पूल दुरुस्त करून पुन्हा सुरू केला. या कार्यामुळे केवळ रस्ता मोकळा झाला नाही, तर समाजात एकतेचा आणि सेवाभावाचा आदर्शही निर्माण झाला. (Latest Ahilyanagar News)
गावातील नागरिकांच्या समस्येची माहिती चैतन्य फाउंडेशनचे संचालक बंडोबा आंधळे यांनी संस्थापक डॉ. अनंत ढोले यांना दिली. पूल तुटल्याने नागरिकांचा तालुक्याशी संपर्क तुटला असून शाळकरी मुले, रुग्ण व शेतकऱ्यांना मोठा त्रास होत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर डॉ. ढोले यांनी तातडीने जेसीबी मशीन पाठवून पूल दुरुस्तीस सुरुवात केली. कामाचा संपूर्ण खर्च फाउंडेशनने उचलत अल्पावधीतच गावाचा संपर्क पुन्हा सुरू झाला.
संकटं आली की माणसातील खरी शक्ती जागी होते. हा पूल केवळ रस्ते जोडत नाही, तर माणसांची मने, आशा आणि भवितव्य जोडतोय, असे प्रतिपादन डॉ. अनंत ढोले यांनी केले. तर, ही केवळ दुरुस्ती नसून ग्रामीण भागातील विकास व एकतेसाठी प्रेरणादायी उदाहरण आहे. आपण सर्व मिळून बदल घडवू शकतो आणि तो आज घडला आहे, असे बंडोबा आंधळे यांनी सांगितले.
फाउंडेशनने यापूर्वीही अनेक समाज हिताचे विधायक उपक्रम राबवून समाजात सकारात्मक बदल घडवला आहे.या उपक्रमाबद्दल गावकऱ्यांनी व युवकांनी चैतन्य फाउंडेशनचे आभार मानले असून या कार्यामुळे चैतन्य फाउंडेशन ग्रामीण भागातील समाजजीवनात एक वेगळं स्थान निर्माण करत आहे. वाळुंज गावातील पूल दुरुस्ती हा त्याच परंपरेतील आणखी एक स्तुत्य उपक्रम ठरला आहे.