जातपंचायत pudhari
अहिल्यानगर

मढीत उधळली जातपंचायत; ‘अनिस’ व पोलिसांची कामगिरी

वैदू समाजाचे पंच म्हणले की ती पंचायत नव्हती

पुढारी वृत्तसेवा

मढी : तालुक्यातील भटक्यांची पंढरी मानल्या जाणार्‍या येथील कानिफनाथ यात्रेत वैदू समाजाची जातपंचायत रविवारी (दि. 23) अंंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या मदतीने उधळली. पोलीस व सामाजिक कार्यकर्ते कोमल वर्दे यांचा इशारा पाहता पंचांसहित सर्वांनी तेथून धूम ठोकली. दरम्यान, वैदू समाजाचे पंच म्हणले की ती पंचायत नव्हती. तो समाजाचा मेळावा होता; तर नाशिकच्या कोमल वर्दे म्हणाल्या, की मेळावा होता तर पोलिस आल्यावर मेळावा लगेच कसा थांबला. छुप्या मार्गाने ती पंचायतच होती.

वर्दे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला व पाथर्डीचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना तक्रार अर्ज पाठवला. त्यावर त्यांनी तत्काळ कार्यवाही करत मढी येथील यात्रेत जातपंचायतीची पाहाणी करण्यासाठी पथक पाठविले. पोलिस पथकाने अशी जातपंचायत घेता येणार नाही, शिवाय सदरचे कृत्य बेकायदेशीर आहे, याची जाणीव करून दिली. त्यामुळे मातब्बर जातपंचांनी नमते घेतले.

दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास राज्यातील जोशी समाजाचा मेळावा होता. त्या मेळाव्यामध्ये राज्यस्तरीय पुरस्कार घेण्यासाठी नाशिकच्या कार्यकर्त्या कोमल वर्दे आल्या होत्या. शेजारीच गर्दी पाहून त्यांनी चौकशी केली असता वैदू समाजाची जातपंचायत सुरू असल्याचे कळताच त्यांनी पोलिस अधीक्षक, निरीक्षक यांना कळवले. पोलिसांनी धाव घेतली त्यावेळी सुरू असलेल्या पंचायतीमधील व्यक्तींनी पोलिसांना पंचायत नसून मेळावा आहे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी कोमल वर्दे यांनी त्यांच्या भाषेत संवादास सुरुवात करून आक्रमक रूप घेत ही जातपंचायतच आहे, असे पोलिसांना व पंचांना सांगितले. उपसभापती नीलम गोर्‍हे यांच्या निदर्शनास प्रकार आणून देणार असे म्हणताच, पोलिसांनी पंचायतीचे कामकाज बंद करून लोकांना पांगवले. त्यानंतर वैदू कार्यकर्ते व ‘अंनिस’ कार्यकर्ते यांच्यात बरीच गरमागरम चर्चा झाली. पोलिस उपनिरीक्षक निवृत्ती आगरकर, हवालदार आदिनाथ बडे, सुखदेव धोत्रे यांनी वैदू बांधवांना कायद्याची कल्पना देत पांगवले.

यावेळी चर्चा करताना श्रीरामपूरचे वैदू समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते मल्लू शिंदे म्हणाले, की समाजामधील दोन-तीन गंभीर समस्यांची चर्चा समाजबांधवापुढे चालू होती. समाज सुधार मेळावा चालू होता, जात पंचायत नव्हती. मढीमध्ये राज्यातील वैदू समाजाचे प्रतिनिधी मढी येथे जमतात. येथून देशभरातील समाज बांधवांमध्ये निरोपाची देवाण-घेवाण होते. तरुणांमध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढवावे. समाजातील आंतरजातीय विवाह मान्यता दिली जात नाही. आदी विषयावर चर्चा सुरू होती. समाजाची आदिवासी संस्कृती आहे. 1892 मध्ये तेलंगणा मधून वैदू सर्वप्रथम बाहेर पडला. इंग्रजांनी वन कायदा त्याकाळी आणला. वनात राहून पोट भरणे, जडीबुटीचे शिक्षण घेत त्यांचा व्यवसाय त्यामुळे बंद पडला. आमची मातृभाषा तेलगू आहे. मूळ चेंचू आदिवासी आहोत. 1901-1902 च्या दरम्यान वैदू मढी येथे येऊ लागला. 1920 च्या गॅझेट मध्ये सुद्धा आमचे वर्णन आहे. आदिवासी संस्कृती एकदम बंद होणार नाही किंवा बदलणार नाही. त्यासाठी आम्ही 40 वर्षापासून झगडतोय.

तेलंगणातील नलामलाई फॉरेस्ट हा भाग देशातील वैदूंचे मुख्य स्थान होते. राज्यातील 27 जिल्ह्यात वैदू समाजाचे बांधव मोठ्या संख्येने आहेत. कोमल वर्दे म्हणाल्या, की सदरचे कृत्य बेकायदेशीर आहे. समाजाच्या कुटुंबावर व वैयक्तिक अन्याय झाला आहे, त्यांनी कायदेशीर पोलिस चौकीत तक्रार करा. पंच व जातपंचायतीवर विश्वास ठेवू नका.

वैदू समाजाची जातपंचायत ही राज्यातील सर्वोच्च जातपंचायत आहे. ती मागे कायमची बरखास्त करण्यात आली होती. तरीही इतके दिवस छुप्या पद्धतीने चालणारी जातपंचायत उघडपणे करण्याची हिंमत पंच करत असल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत.
कृष्णा चांदगुडे,राज्य कार्यवाह, जातपंचायत मूठमाती अभियान (अंनिस)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT