श्रीगोंदा : श्रीगोंदा-जामखेड राष्ट्रीय महामार्गावरील आढळगाव शिवारात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन तरुणांना रस्त्याने जाणार्या बोलेरो गाडीने जोरदार धडक दिली. या धडकेत दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना दि. 4 रोजी रात्री 10 वाजता घडली.
रोहित भरत शिंदे (वय 22), अतुल एकनाथ शिंदे (वय 30) असे अपघातात मयत झालेल्या तरुणांची नावे आहेत. या प्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Ahilyanagar News Update )
या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील आढळगाव परिसरातील बारा नंबर चारीलगत आढळगाव येथील रोहित शिंदे आणि अतुल शिंदे हे चुलते पुतणे असलेले दोन तरुण श्रीगोंद्याहून आले. बारा नंबर वितरिका नजीक दोघेजण उभे राहून गप्पा मारत असताना श्रीगोंदा येथून आढळगाव येथे जाणार्या एम.एच. 16 ए. जे.0482 या चारचाकी बोलेरो गाडीने त्यांना जोरदार धडक दिली. घटनेनंतर बोलेरो गाडीच्या चालकाने जखमींना उपचारासाठी दवाखान्यात घेऊन जाण्याऐवजी तेथून पलायन केले. या धडकेत चुलते पुतणे असलेले दोघेजण गंभीर जखमी झाले. त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.
अपघातात तरुणांच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी वाहन चालकाला अटक करून अपघातातील वाहन ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यासाठी सोमवारी (दि. 5) सकाळी 9 वाजता गाव बंद करीत रास्ता रोको आंदोलन सुरू केले.
यावेळी सहायक पोलिस निरीक्षक प्रभाकर निकम, गणेश आहेर, पोलिस उपनिरीक्षक मनोहर खिळदकर आणि पोलिस कर्मचारी दत्तात्रय शिरसाठ, सचिन गोरे यांनी आंदोलनकर्त्या नातेवाईकांशी चर्चा केली. पोलिसांच्या आश्वासनानंतर चार तासांनंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.