Pathardi news Pudhari
अहिल्यानगर

Pathardi news: बीएलओ शिक्षिकेचा मृत्यू ‘ऑन ड्यूटी’ तणावामुळे? शिक्षकांमध्ये संताप

प्रशासनाने दखल घेण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

पाथर्डी: निवडणूक विभागाच्या बीएलओ म्हणून काम करत असताना आलेल्या मानसिक तणावामुळे पाथर्डी तालुक्यातील प्राथमिक शिक्षिका सुनीता यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याचा दावा करत, पाथर्डी तालुका प्राथमिक शिक्षक समन्वय समितीने प्रशासनाकडे मृत शिक्षिकेच्या कुटुंबाला राष्ट्रीय कर्तव्यावरील सर्व कायदेशीर संरक्षण, विमा लाभ आणि आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. बीएलओ म्हणून काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना 'ऑन ड्युटी' संरक्षणाची लेखी हमी देण्याची मागणीही जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

समितीने दिलेल्या निवेदनानुसार, सुनीता यांच्याकडे निवडणूक विभागाचे बीएलओ म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली होती. सध्या सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेच्या कामामुळे शिक्षकांवर मोठ्या प्रमाणात मानसिक दडपण असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. रविवारी (दि. २८ जून) त्यांनी बीएलओचे साहित्य ताब्यात घेतले होते.

त्यानंतर कामाच्या वाढत्या ताणामुळे त्या मानसिक दडपणाखाली होत्या. मंगळवारी (दि. ३० जून) त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यात त्यांचे निधन झाले. निवडणूक कामाच्या ताणामुळे एका शिक्षिकेचा बळी गेल्याची भावना शिक्षकांनी व्यक्त केली आहे.

या प्रकरणाची प्रशासनाने गंभीर दखल घेऊन सुनीता यांच्या कुटुंबाला राष्ट्रीय कर्तव्यावर असताना मृत्यू झाल्यामुळे मिळणारे सर्व कायदेशीर लाभ, विमा संरक्षण आणि आर्थिक सहाय्य तातडीने मंजूर करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

यासोबतच जिल्ह्यातील सर्व बीएलओ कर्मचाऱ्यांना निवडणूक व विशेष पुनरीक्षणासारख्या तणावपूर्ण कामादरम्यान संपूर्ण कायदेशीर संरक्षण ऑन ड्यूटी दर्जा आणि सुरक्षिततेची लेखी हमी देण्यात यावी, अशीही मागणी शिक्षक समन्वय समितीने केली आहे.

हे निवेदन अहिल्यानगर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांना देण्यात आले. यावेळी तालुक्यातील अनेक शिक्षिका, शिक्षक आणि शिक्षक समन्वय समितीचे पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार डॉ. उद्धव नाईक यांना निवेदन दिले. यावेळी राजेंद्र जायभाये, अर्जुन शिरसाट, कल्याण लावंडे, गीता खेडकर, जयश्री कीर्तने, भालचंद्र गर्जे, महादेव गोल्हार, मीरा मुंढे, शैला डोईफोडे, बाबा जायभाये, संजय कीर्तने, रमेश वाघ, पप्पू बोरुडे यांच्यासह अनेक शिक्षक सहभागी झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT