कर्जत : भारतीय जनता पक्ष आपला दिवस साजरा करत असतानाच, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांना धक्का दिला आहे. कर्जत नगरपंचायत मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या नगरसेवकांमध्ये फूट पाडून तब्बल आठ नगरसेवक भाजप सोबत गेले आहेत. कर्जत नगरपंचायत मध्ये राजकीय भूकंप झाला आहे.
नगरपंचायत चे तेरा नगरसेवक हे सहलीवर गेले आहेत. भारतीय जनता पक्षाचे प्रवीण घुले यांच्या नेतृत्वाखाली हे सर्व १३ नगरसेवक सहलीवर रवाना झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे आठ, काँग्रेस पक्षाचे तीन व भारतीय जनता पक्षाची दोन नगरसेवक यांचा समावेश आहे .
सुट्टीच्या दिवशी अविश्वास ठराव दाखल
नगरपंचायत चे गटनेते संतोष मेहत्रे यांनी सांगितले की, नगराध्यक्ष उषा राऊत यांच्या विरोधात रामनवमी व रविवारचा सुट्टीचा दिवस असताना देखील, विशेष बाब म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे १३ सदस्यांच्या सहीने अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. सुट्टीच्या दिवशी निवासी उपजिल्हाधिकारी यांनी स्वतः कार्यालयात उपस्थित राहून अविश्वास ठराव दाखल करून घेतला यामध्ये मोठ्या राजकीय हालचाली पडद्यामागे झाल्याचे दिसून येते.
जे तेरा नगरसेवक सहलीवर गेले आहेत यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे गटनेते संतोष मेहत्रे, उपगटनेते सतीश पाटील , छाया सुनील शेलार, ताराबाई सुरेश कुलथे, ज्योती लालासाहेब शेळके, सुवर्णा रवींद्र सुपेकर, लंकाबाई देविदास खरात, भास्कर भैलुमे, काँग्रेस पक्षाच्या उपनगराध्यक्ष रोहिणी घुले, मोनाली तोटे, व भाऊसाहेब तोरडमल, भाजपचे माया दळवी व मोहिनी पिसाळ यांचा यामध्ये समावेश आहे.
आता रोहित पवार यांच्यासोबत नगराध्यक्ष उषा राऊत, माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत, माजी नगराध्यक्ष प्रतिभा भैलूमे, नगरसेवक अमृत काळदाते असे चार नगरसेवक राहिले आहेत.
या सर्व राजकीय घडमोडींमुळे मोठी खळबळ उडाली आहे.आता रोहित पवार काय करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.