पारनेर: आष्टी मतदारसंघाचे भाजप आ. सुरेश धस यांचा मुलगा सागर धस याच्या कारने दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात तालुक्यातील पळवे खुर्द येथील नितीन प्रकाश शेळके (वय 34) यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी (दि. 7) रात्री साडेदहा वाजेदरम्यान जातेगाव घाट फाट्यावर झाला. या प्रकरणी मंगळवारी (दि. 8) दुपारी सुपे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
स्वप्नील पोपट शेळके यांनी सुपा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सागर सुरेश धस (रा. आष्टी, ता. आष्टी, जि. बीड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी रात्री साडेदहा वाजेेदरम्यान नितीन शेळके अहिल्यानगर-पुणे महामार्गावर पळवे खुर्द शिवारातील जातेगाव फाट्यावर त्याच्या दुचाकीवरून रस्ता ओलांडत असताना सागर धस याच्या कारने पाठीमागून जोराची धडक दिली. (Latest Ahilyanagar News)
धस हा अहिल्यानगरकडून पुण्याच्या दिशेने निघाला होता. जोराची धडक बसल्याने शेळके यांचा दवाखान्यात नेईपर्यंत मृत्यू झाला. या अपघातात दुचाकीसह कारचे मोठे नुकसान झाले आहे. पुढील तपास सुपा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मंगेश नागरगोजे पुढील तपास करत आहेत.