भाजप शहराध्यक्षाला संगमनेरात मारहाण (file photo)
अहिल्यानगर

Sangamner News: भाजप शहराध्यक्षाला संगमनेरात मारहाण

उबाठा सेना पदाधिकार्‍याविरुद्ध गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

Sangamner: धांदरफळ येथील डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मेळाव्यातील आक्षेपार्ह वक्तव्य आणि त्यानंतर झालेली जाळपोळ यामुळे विखे-थोरात यांच्यात निर्माण झालेला वाद मंगळवारी भाजपच्या शहराध्यक्षाला झालेल्या मारहाणीने पुन्हा उफाळून आला.

भाजपचे शहराध्यक्ष अ‍ॅड. श्रीराम गणपुले यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी शहरप्रमुख अमर कतारी यांनी मारहाण केल्याचा गुन्हा दाखल झाला आणि मंत्री राधाकृष्ण विखेपाटील गणपुले यांच्यासाठी, तर आमदार बाळासाहेब थोरात कतारी यांच्यासाठी पोलीस ठाण्यात दाखल झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार अमोल खताळ यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने नवीन नगर रस्त्यावरील यशवंत चव्हाण प्रशासकीय भवन परिसरात जमले होते.

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे महायुतीच्या उमेदवाराचा अर्ज दाखल करण्यासाठी येणार असल्याने सर्वच त्यांच्या प्रतीक्षेत होते. भाजपचे शहराध्यक्ष अ‍ॅड. श्रीराम गणपुले हे आपल्या सहकार्‍यासमवेत एका चहाच्या टपरीवर बसले होते. याच वेळी अमर कतारी तेथून जात असताना त्यांनी गणपुले यांना थेट मारहाण करण्यास सुरुवात केली. जवळच्या कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करत दोघांना बाजूला केले. या घटनेनंतर गणपुले यांनी शहर पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. कतारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महसूलमंत्री विखे थेट पोलीस ठाण्यात

भाजपचे शहराध्यक्ष गणपुले यांना मारहाण केल्याची बातमी शहरात पसरताच कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील स्वतः शहर पोलिस ठाण्यात आले. त्यांनी पोलिस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख याची भेट घेतली. या घटनेबाबत चिंता व्यक्त करत कतारी यांच्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी करत त्यांनी अधिकार्‍यांची कानउघाडणी केली. या वेळी भाजपच्या पदाधिकार्‍यांनी कतारी यांच्यावर अवैध व्यवसाय करीत असल्याचा आणि पदाचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप केला.

आ. थोरात व तांबेही पोलीस ठाण्यात

सायंकाळी साडेसातच्या सुमारास खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे, अमर कतारी, हेही शहर पोलिस ठाण्यात आले. त्यांनी कतारी यांच्यावर सूडभावनेने कारवाई करू नये, अशी मागणी केली. गणपुले यांच्यावरही गुन्हा दाखल करा, अशी मागणी त्यांनी केली. आ. थोरात म्हणाले, लोणीची दहशत येथे आणली जात आहे. खोटे गुन्हे दाखल केले जात असून त्रास देण्याचे काम सुरू झाले आहे. पदाधिकारी कार्यकर्त्यांनी घाबरू नये. दरम्यान, आमदार थोरात चाळीस वर्षांत प्रथमच शहर पोलिस ठाण्यात स्वतः आले. याची आठवण त्यांनी पोलिस अधिकार्‍यांना करून दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT