नगर: उत्तर जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरलेल्या भंडारदरा जलाशयाचा शताब्दी महोत्सव साजरा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शताब्दी महोत्सव समिती गठित करण्यात आली आहे. या धरणास आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे जलाशय असे नाव देण्याचा निर्णय यापूर्वीच केला होता.
भंडारदरा धरणास यंदा शंभर वर्ष पूर्ण होत आहेत. धरणाचे शंभरावे वर्ष या भागाच्या विकासात्मक दृष्टिने साजरे व्हावे, अशी संकल्पना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील मांडून त्याची कार्यवाही सुरू केली आहे. (Latest Ahilyanagar News)
भंडारदरा जलाशयाचे संवंर्धन आणि या भागातील पर्यटनाला संधी निर्माण करून देण्याच्या उपाययोजनांच्या सूचना आणि त्यादृष्टिने कराव्या लागणार्या उपाययोजनांसाठी संबंधित विभागांशी समन्वय साधून आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शताब्दी महोत्सव समिती स्थापन करण्यात आली.
या समितीमध्ये सदस्य म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राज्याचे मुख्य सचिव, जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव तर सदस्य सचिव म्हणून गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची निवड करण्यात आली आहे.
अकोले तालुक्याच्या नैसर्गिक आणि भौगोलिक पार्श्वभूमिवर भंडारदरा धरणाची निर्मिती झाली. या धरणामुळे उत्तर जिल्ह्याच्या अकोले, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर, राहुरी व नेवासा या तालुक्यांतील सिंचन क्षेत्रात मोठी वाढ झाली. या भागातील कृषी सहकार आणि अर्थिक विकासाला मोठे पाठबळ मिळून जिल्ह्याचा विकासाला मोठा हातभार लागला आहे.
भंडारदरा जलाशयाचा शताब्दी महोत्सव साजरा करण्याच्या दृष्टिने जलसंपदा विभागाने विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या वतीने तयार करण्यात येणार्या निर्णयाचे आपण स्वागत करीत असून, भंडारदरा जलाशयाचे संवंर्धन आणि पर्यटन विकासाला पाठबळ मिळेल.- राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा मंत्री