नगर : भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशस्तरावरून जिल्हाध्यक्षांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. त्यात अहिल्यानगर जिल्ह्यात पुन्हा जुन्यांनाच संधी देण्यात आली. दक्षिण जिल्हाध्यक्षपदी दिलीप भालसिंग व उत्तर जिल्हाध्यक्षपदी नितीन दिनकर यांची फेरनिवड करण्यात आली.
राज्यातील 58 जिल्हाध्यक्षांच्या निवडी प्रदेशपातळीवरून जाहीर करण्यात आल्या. प्रदेश निवडणूक अधिकारी आमदार चैनसुख संचेती यांनी ह्या निवडी जाहीर केल्या. अहिल्यानगर जिल्ह्यात दक्षिण आणि उत्तर अशा दोन्ही जिल्हाध्यक्षांना पुन्हा संधी मिळाली आहे. अहिल्यानगर दक्षिणच्या जिल्हाध्यक्षपदी दिलीप भालसिंग यांची फेरनिवड करण्यात आली. दिलीप भालसिंग हे भाजपचे जुने निष्ठावान व सक्रीय कार्यकर्ते आहेत.
त्यांच्या जिल्हाध्यक्षपदाच्या कार्यकाळात विधानसभा निवडणुका पार पडल्या. त्यात पक्षाला घवघवीत यश मिळाले. ते आमदार शिवाजी कर्डिले यांचे निकवर्तीय मानले जातात. तर, अहिल्यानगर उत्तर जिल्हाध्यक्षपदी नितीन दिनकर यांची वर्णी लागली. उत्तर नगरचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे विधानसभेवर निवडून गेल्यानंतर उत्तर नगर जिल्हाध्यक्ष पदाची धुरा नितीन दिनकर यांच्याकडे सोपविण्यात आली होती. दोन्हीही जिल्हाध्यक्षांना भाजप प्रदेशस्ताने पुन्हा संधी दिली.
दरम्यान, राज्यात 78 जिल्हाध्यक्ष व शहर जिल्हाध्यक्षांच्या निवडी होणार होत्या. पण त्यातील 58 निवडी जाहीर झाल्या असून, 20 निवडी बाकी आहेत. आता त्या 20 जिल्हाध्यक्षांच्या निवडीचा चेंडू केंद्रीय भाजपाच्या कोर्टात गेल्याची माहिती सूत्रांकडून समजली. त्यात अहिल्यानगर शहर जिल्हाध्यक्ष निवडीचा समावेश आहे.
अहिल्यानगर शहर जिल्हाध्यक्ष पदासाठी माजी महापौर बाबासाहेब वाकळे, उप जिल्हाध्यक्ष बाबासाहेब सानप व शहर भाजपचे सचिव सचिन पारखी यांची नावे आघाडी आहेत. सर्वच कार्यकर्ते सक्रीय व कार्यकारिणीतील पदाधिकारी असल्याने चुरस निर्माण झाली आहे. स्पर्धेतील सर्वच कार्यकर्ते तोलामोलाचे असल्याने प्रदेशपातळीवरून कोणाच्या पारड्यात माप टाकायचे यावर खल सुरू होता. अखेर निवड केंद्रीय भाजपच्या कोर्टात गेल्याचे समजते.