Krishna Maharaj Shastri Pudhari
अहिल्यानगर

Krishna Maharaj Shastri: भगवान गडाच्या महंतपदी कृष्णा महाराज विराजमान

गडावर राजकारण आणू नये : डॉ. नामदेव शास्त्री

पुढारी वृत्तसेवा

पाथर्डी/खरवंडी कासार: संत भगवानबाबांनी स्थापन केलेल्या श्री क्षेत्र भगवानगडाच्या अमृत महोत्सवी वर्षात दसऱ्याच्या मुहूर्तावर मंगळवारी सकाळी कृष्णा महाराज शास्त्री यांची गडाच्या चौथ्या महंतपदी विधिवत नियुक्ती करण्यात आली.

मावळते मठाधिपती डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. गडाच्या स्थापनेला ७५ वर्षे पूर्ण होत असताना झालेल्या या नियुक्तीने भगवान गडाच्या धार्मिक परंपरेत नवा अध्याय सुरू झाला.

डॉ. नामदेव शास्त्री यांनी सामाजिक जीवनातून निवृत्ती घेत यापुढील आयुष्य 'ज्ञानेश्वरी' च्या भावानुवादासाठी समर्पित करण्याचा संकल्प जाहीर केला. डॉ. नामदेव शास्त्री म्हणाले, भगवानगड कुठल्याही राजकारणात कधीही भाग घेणार नाही, हा माझा शब्द आहे. अनेक नेते या गडावर आले, त्यांनी गडाच्या विकासात योगदान दिले.

यशवंतराव चव्हाण यांच्यापासून गोपीनाथ मुंडे यांच्यापर्यंत अनेक मान्यवरांचे योगदान राहिले आहे. भविष्यातही धनंजय मुंडे यांच्यासह अनेक नेत्यांचे योगदान राहील. कोणालाही गडावर येऊन दर्शन घेण्यास बंदी नाही. मात्र, धार्मिक स्थळाचा उपयोग राजकीय हेतूंसाठी होऊ नये. भगवानगड ही अध्यात्माची शाखा आहे आणि तिचे पावित्र्य कायम राहिले पाहिजे. गडावर कोणत्याही प्रकारचे राजकारण आणू नये.

भगवानगडाचा उपयोग केवळ अध्यात्मासाठीच व्हावा, हीच माझी भूमिका आहे. कृष्णा महाराज शास्त्री आता भगवानगडाच्या गादीवर विराजमान झाले आहेत, त्यांनी सर्वांना सोबत घेऊन कार्य केले पाहिजे. मन मोठे ठेवले पाहिजे आणि छोट्या-मोठ्या चुका झाल्या तरी त्या माफ केल्या पाहिजेत.

कोणाचाही राग मनात धरू नये. आई जशी आपल्या मुलांच्या चुका माफ करते, त्याचप्रमाणे महंतांनीही सर्वांना सामावून घेतले पाहिजे. महंतपद हे केवळ अधिकाराचे पद नसून समाजाप्रती जबाबदारीचे पद आहे. लोकांच्या अडचणी समजून घेणे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करणे महत्त्वाचे आहे.

अध्यात्माचा खरा संदेश क्षमा, प्रेम आणि सेवाभाव यात आहे. कृष्णा महाराजांनी याच विचारातून भगवानगडाची परंपरा पुढे न्यावी. कृष्णा महाराज शास्त्री हे मूळचे तेलंगणा राज्यातील असून, त्यांनी भगवानगडावरील ज्ञानेश्वरी विद्यापीठात सलग १२ वर्षे अध्ययन केले.

त्यानंतर एकनाथवाडी येथील निरंजन संस्थानचे महंत म्हणून सुमारे तीन वर्षे कार्य केले. डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांनी सुमारे दोन वर्षांपूर्वी त्यांना उत्तराधिकारी घोषित केले होते. आता दसऱ्याच्या मुहूर्तावर त्यांची चतुर्थ महंतपदी नियुक्ती झाली आहे.

गडाच्या कामाला नवा आधार! महंत डॉ. नामदेव शास्त्री म्हणाले, चौथा महंत नियुक्त केल्याने मला मोठा आधार मिळाला आहे. सून सासू झाल्यानंतर तिच्या हाताखाली कामाला मदत मिळते, त्याचप्रमाणे महंत नियुक्तीमुळे गडाच्या कामात सहकार्य मिळणार आहे. मला आता बौद्धिक कामासाठी अधिक वेळ देता येईल.

गडावर फिरणे, लोकांपर्यंत पोहोचणे आणि त्यांच्या अडचणी समजून घेण्याची जबाबदारी दोघे मिळून पार पाडता येईल. त्यामुळे गडाच्या विकासकामांना अधिक गती मिळेल. दोघांच्या सहकार्याने भगवानगडाची वाटचाल अधिक वेगाने होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT