Gambling Pudhari
अहिल्यानगर

Belwandi Police Raid: बेलवंडी पोलिसांच्या छाप्यावरच संशय; बिंगो-मटका अड्ड्यावर कारवाई का नाही?

पोलिस ठाण्यापासून अवघ्या ५०० मीटरवर जुगार अड्डा; छाप्याचा व्हिडिओ व्हायरल, उच्चस्तरीय चौकशीची मागणी

पुढारी वृत्तसेवा

श्रीगोंदा: बेलवंडी पोलिस ठाण्यापासून केवळ पाचशे मीटर अंतरावर राजरोसपणे सुरू असलेल्या बिंगो-मटका जुगार अड्ड्यावर छापा टाकूनही पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्याचा आरोप होत आहे. पोलिसांनी कारवाई का केली नाही, याबाबत उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

बेलवंडी पोलिस ठाण्याच्या महिला पथकाने दोन दिवसांपूर्वी परिसरातील एका जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या ठिकाणी बिंगो आणि मटका सुरू असल्याचे स्पष्ट दिसत होते. विशेष म्हणजे या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मात्र, धक्कादायक बाब म्हणजे, एवढे पुरावे हातात असतानाही पोलिसांनी आरोपींना ताब्यात का घेतले नाही.ज्या ठिकाणी छापा टाकला तिथे काही सापडले नाही असा पोलिस पथकाचा युक्तिवाद असेल तर तशी स्टेशन डायरीत नोंद का नाही. असे एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जात आहेत.

त्यामुळे "देखावा म्हणून छापा टाकून प्रकरण मिटवले का ?" असा संशय नागरिक व्यक्त करत आहेत. या प्रकारामुळे गृहखात्याची आणि स्थानिक पोलिस प्रशासनाची प्रतिमा डागाळली आहे. व्हिडिओमध्ये पोलिस घटनास्थळी असतानाही कारवाई का झाली नाही? याचे उत्तर कोणीही देत नाही. नागरिक आणि सामाजिक संघटनांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.

संबंधित कर्मचाऱ्यांचे कॉल रेकॉर्ड, व्हिडीओची सत्यता आणि स्टेशन डायरीतील नोंदी तपासून दोषींवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.आता जिल्हा पोलिस अधीक्षक सुदर्शन मुमक्का या प्रकरणाची दखल घेऊन काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बेलवंडी पोलिसांच्या या संशयास्पद कारभारावर पांघरूण घातले जाणार की जबाबदारी निश्चित केली जाणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान, सहाक पोलिस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT