Electricity Pudhari
अहिल्यानगर

Power Cut News: ऐन उन्हाळ्यात विजेचा लंपडाव; नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

बेलापूर सबस्टेशनचा बोजवारा

पुढारी वृत्तसेवा

श्रीरामपूर: बेलापूर सबस्टेशन अंतर्गतच्या वीज वितरणाचा बोजवारा उडाला आहे. दररोज कोणत्या न कोणत्या कारणाने वीज पुरवठा खंडीत होत आहे. ऐन उन्हाळ्यात विजेचा लंपडाव सुरू असल्याने बेलापूर पंचक्रोशीतील नागरीक, व्यावसायिक, व्यापारी त्रस्त झाले आहे.

परिणामी, येत्या शनिवारपर्यंत वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन करून नुकसान भरपाईसाठी न्यायालयात दावा दाखल करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

बेलापूर सबस्टेशन अंतर्गतच्या गावांचा वीज वितरणाबाबत गंभीर तक्रारी आहेत. दर शनिवारी दुरुस्ती व देखभालीच्या कारणास्तव शट डाऊन घेतला जातो. मग शनिवारच्या दिवशी दुरुस्ती व देखभालीची कामे केली जातात.

तर लगेच रविवारी डीपी बसविण्यासाठी शट डाऊन का घेतला गेला. शनिवारीच डीपी का बसविली नाही. अधिकारी शनिवारच्या दुरुस्ती व देखभालीकडे दुर्लक्ष करतात. याबाबत नागरीकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

सध्या उन्हाची तिव्रता वाढलेली आहे. त्यात दररोज वीज पुरवठ्याचा बोजवारा उडत असल्याने गावातील नळ योजनेद्वारे पाणी पुरवठा, शेतीतील उभ्या पिकांना पाणी देणे अशक्य होत आहे. आजपर्यंत जोपासलेली पिके महावितरणाच्या दुर्लक्षामुळे करपून चालली आहेत.

त्याला बेलापूर सबस्टेशन जबाबदार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे येत्या शनिवारपर्यंत बेलापूर सबस्टेशान अंतर्गतचा वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास बेलापूर पंचक्रोशीतील शेतकरी, व्यावसायिक, व्यापारी व नागरीक सबस्टेशनमध्ये घेराओ आंदोलन करणार आहेत. याची अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी, असा इशारा दिला आहे.

परीक्षांच्या कालावधीत अभ्यासावर परिणाम

खंडीत वीज पुरवठ्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील पीठ गिरणी चालक, मसाला कांडप चालक, कोल्ड्रींक्स व्यावसायिक, हॉटेल चालक व व्यापारी त्रस्त आहेत. तसेच सध्या शालेय परिक्षांचा कालावधी असून सायंकाळी विजेचा लंपडाव सुरू असल्याने मुलांच्या अभ्यासावर परिणाम होत असल्याचे पालक सांगत आहे.

सध्या शेतीसाठी नियमित वीज पुरवठा होत नाही. अनेकदा रात्रीच्या वेळी वीज मिळते. त्यात बिबट्याचा वावर असल्याने जीव धोक्यात घालून पीकांना पाणी द्यावे लागते. विजेचा दाब नियमिन नसल्याने कृषीपंप जळण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शेतीला दिवसा किमान आठ तास योग्य दाबाने वीज पुरवठा झाला पाहिजे.
-बाळकृष्ण मुंगसे, शेतकरी, वळदगाव
बहुतांश लोक उन्हामुळे सकाळच्यावेळी दळण घेवून येतात. नेमके ह्याच वेळेत वीज नसते. त्यामुळे ग्राहकांना वीज येईपर्यंत ताटकळत बसावे लागते. दिवसभर वीज नसल्याने पीठ गिरणीतील कामगाराचा खर्च अंगावर पडतो. तसेच कधीकधी खंडीत व कमी दाबाच्या विज पुरवठ्यामुळे विद्युत मोटारी जळून नुकसान होते.
-रमेश मिसाळ, पीठ गिरणी व्यावसायिक, बेलापूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT