वाळकी: टपरीचा पत्रा काढण्यासाठी चुलत भावास समजावून सांग, असे म्हटल्याचा राग आल्याने तिघांनी हॉटेल चालकासह त्याच्या कुटुंबातील महिलांना शिवीगाळ करीत लोखंडी पाईप, लाथाबुक्क्यानी बेदम मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना नगर तालुक्यातील खारेकर्जुने येथे शुक्रवारी (दि. 23) सकाळी नऊ वाजता घडली.
याबाबत संभाजी अर्जुन मुळे (वय 42 रा. खारेकर्जुने, ता.नगर) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी मुळे यांचे खारेकर्जुने गावात वडापाव व नाष्ट्याचे हॉटेल आहे. त्याच्या शेजारी अविनाश तांबे याचे पंक्चरचे दुकान आहे. या दुकानाचा पत्रा फिर्यादीच्या हॉटेलसमोर आला होता. (Ahilyanagar News Update)
तो काढण्याबाबत त्यांनी तांबे यास अनेकदा सांगूनही त्याने तो काढला नव्हता. 23 मे रोजी तेथे अविनाशचा चुलत भाऊ पिनू अप्पासाहेब तांबे, बंटी बाळासाहेब तांबे, बबलू पिनू तांबे, (सर्व इसळक, ता.नगर ) हे बोलेरो गाडीतून आले. त्यावेळी फिर्यादीने पिनू तांबे यास तुझा चुलत भावास टपरीचा पत्रा काढून घेण्यास सांगितले.
परंतु तो काढत नाही, त्या समजावून सांग. असे म्हटल्याचा राग आल्याने त्याने फिर्यादीस शिवीगाळ केली, तसेच तिघांनी बोलेरो गाडीतून लोखंडी पाईप काढून फिर्यादीस मारहाण सुरू केली. तो आरडाओरडा ऐकून फिर्यादीचे आई, वडील, पत्नी, बहीण, भाचा हे तेथे आले असता, त्यांना ही या तिघांनी लोखंडी पाईपने व लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली.
या मारहाणीत फिर्यादीसह चंद्रकला अर्जुन मुळे, धनश्री शिवाजी मुळे, अर्जुन कारभारी मुळे, स्वप्निल टांगळ, संगीता टांगळ व मनीषा मुळे जखमी झाले.याप्रकरणी संभाजी मुळे यांनी दिलेला फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलिस ठाण्यात पिनू तांबे, बंटी तांबे, बबलू तांबे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.