मविआच घेणार ‘राज’बाबत निर्णय: बाळासाहेब थोरात Pudhari
अहिल्यानगर

Maharashtra Politics|मविआच घेणार ‘राज’बाबत निर्णय: बाळासाहेब थोरात

बाळासाहेब थोरात यांची महायुती सरकारवर जोरदार टीका

पुढारी वृत्तसेवा

Balasaheb Thorat statement on Raj Thackeray

संगमनेर: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. या बैठकीत राज ठाकरे यांच्या मनसेच्या समावेशासंदर्भात निर्णय घेतला जाईल, अशी माहिती ज्येष्ठ नेते तथा काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांनी दिली.

लाडक्या बहिणीसाठी 2100 रुपये, शेतकर्‍यांना कर्जमाफी, आमदारांच्या मारामार्‍या, घोटाळे, भ्रष्टाचारावर मुख्यमंत्री पांघरून घालत असल्याचा आरोप करतानाच महायुती सत्तेसाठी राज्याला अधोगतीकडे नेत असल्याची टीका थोरात यांनी केली. (Latest Ahilyanagar News)

वादग्रस्त मंत्री, त्यांची वक्तव्ये आणि सरकारचा कारभार यावर मंत्री थोरात यांनी माध्यमांशी संवाद साधत भाष्य केले. थोरात म्हणाले, मंत्र्यांनी कसे वागावे ही सांगण्याची वेळ यावी, हे दुर्दैवी आहे. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे चुकलेच आहेत. मंत्री घोटाळे, भ्रष्टाचार करत आहेत. आमदारांचा गोळीबार, मारामारी, सत्ताधार्‍यांची बेताल वक्तव्य सुरू असताना मुख्यमंत्री मात्र त्यांच्यावर पांघरून घालत आहेत.

सुप्रीम कोर्टाने तीन हजार कोटींचा घोटाळा निदर्शनास आणून दिला. ऑर्डर रद्द करावी लागली. आमदारांचे भाऊ आता गोळीबार करत आहेत. प्रवीण गायकवाड यांच्यावर हात उचलला. बीडमध्ये भयानक अवस्था निर्माण झाली आहे. विधानभवनात गुंड शिरताहेत, भाजप त्यांना संरक्षण देते आहे. लोकशाही मार्गाने आंदोलनाचा अधिकार काढून घेण्यासाठी जनसुरक्षा विधेयक सरकारने पास करून घेतले आहे. देशात इतर राज्ये पुढे जात असताना पुरोगामी महाराष्ट्राची आता अधोगतीकडे वाटचाल सुरू असल्याचे थोरात म्हणाले.

लोकशाहीमध्ये सत्ताधारी आणि विरोधक हे एका गाडीची दोन चाके असतात. लोकशाहीत विरोधकांचे महत्त्व मोठे आहे. परंतु अलीकडे विरोधकांना चिरडून टाकले जात आहेत. पूर्वी निधी वाटपामध्ये कधीही दुजाभाव केला जात नव्हता.

आता विरोधी आमदारांना शून्य टक्के निधी दिला जात आहे. संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना योजनांसाठी पैसे नाहीत. सात महिन्यांपासून या गरीब लोकांना कोणतेही पैसे मिळत नसल्याचा दावा थोरात यांनी केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवत त्यांना निधी दिला जाणार असल्याकडे थोरात यांनी लक्ष वेधले.

नगरविकास विभागाचा निधी मुख्यमंत्री ठरवणार आहे. मंत्रिमंडळात अविश्वासाचे वातावरण आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची बैठक होऊन राज ठाकरे यांच्या समावेशासंदर्भात निर्णय होईल.
-बाळासाहेब थोरात, माजी मंत्री

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT