चाहूल बैल पोळ्याची.. लगबग कुंभार बांधवांची! Pudhari
अहिल्यानगर

Bail Pola 2025: चाहूल बैल पोळ्याची.. लगबग कुंभार बांधवांची!

राजूरमध्ये मातीचे बैल बनविण्याची तयारी

पुढारी वृत्तसेवा

अकोलेः श्रावण महिन्याच्या शेवटी पिठोरी अमावास्येला येणारा शेतकर्‍यांचा सर्जा-राजाचा सण बैल पोळानिमित्त कुंभार बांधांचा पारंपरिक व्यवसाय अजूनही टिकून आहे. मातीचे बैल बनविण्याची त्यांची लगबग सुरू झाली आहे. या सणामुळे हाताला काम मिळून, संसाराला आर्थिक हातभार लागण्यास मदत होते.

मातीत राबणार्‍या सर्जा-राजाप्रती ऋणानुबंध जोपासून, बळीराजा पोळ्याच्या दिवशी मातीच्या शेतात राबणार्‍या बैलांसह काहीजण मातीच्या बैलांची पूजा करतात. दुसर्‍या दिवशी मातीचे बैल शेतात ठेवून, ते घरोघर पोहोचविण्याचे काम कुंभार बांधव करतात. (Latest Ahilyanagar News)

पोळ्याची चाहूल लागताच कुंभार बांधव महिनाअगोदरचं मातीचे बैल बनविण्याचा श्रीगणेशा करतात. माती एकत्र करून, मळवून ते हुबेहूब सर्जा-राजा साकारतात. मातीच्या या बैलांना राजूरच्या बाजारपेठेत मोठी मागणी असते.

पूर्वी बैल देण्याच्या बदल्यात कुंभार बांधवांना गहू, बाजरी, तांदूळ, ज्वारी, कुरासणी, वरई, कडधान्य मिळत आदी दिले जात असे; परंतू कालौघात शेतकर्‍यांनी धान्य पेरणी कमी केल्यामुळे आता 20-25 रुपये किंवा धान्य दिले जाते. अनेक गावांमध्ये शेती व्यवसाय कमी झाल्यामुळे बहुतांशः वेळा रोख रक्कम मिळते, असे या कुंभार बांधवांनी सांगितले. पोळा सणाला दोन- तीन दिवस उरले की, कुंभार बांधव घरोघरी फिरतात.

घरोघर वाटतात मातीचे बैल!

अकोले तालुक्यातील राजूर येथील कुंभार बांधव, भंडारदरा, सावरकुठे, मवेशी, रणद, कातळापूर, माळेगाव, माणिक ओझर, केळुगण, शेणित, देवगाव, आंबेवगण, मान्हेरे, खडकी, गुहिरे, चितळवेढे, निळवंडे, दिगबंर, पिपरकणे, गोदोशी, साकिरवाडी, कुमशेत, पाचनई, लव्हाळी, कोहंडी आदी गावांमध्ये घरोघर जाऊन मातीचे बैल वाटतात. प्रत्येक घरात सात किंवा नऊ बैल द्यावे लागतात. राजूर परिसरातील बैलांना मोठी मागणी आहे. यामुळे महिना-दीड महिना अगोदरपासूनच हा व्यवसाय सुरु होतो.

‘वडिलोपार्जित पारंपरिक व्यवसाय आम्ही टिकवला आहे, परंतू पुढील पिढी या व्यवसायापासून दूर जात आहे. जुन्या काळी मातीच्या बैलांच्या मोबदल्यात वर्षभर पुरेल एवढे धान्य शेतकरी देत असे, परंतू आता 20 - 30 रुपये दिले जातात. परीश्रम जास्त अन् मोबदला कमी मिळतो. यामुळे या व्यवसायाकडे अनेक कुंभार बांधव पाठ फिरवित आहेत. खरेतर, पुढच्या पिढीने या व्यवसायात यावे. पारंपरिक प्रथा पुढे न्यावी.
लक्षण भालेराव. कुंभार बांधव, राजूर.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT