कोळगाव: शेतकरी दररोज आत्महत्या करीत आहेत, अतिवृष्टीमुळे पुरात पिके वाहून गेली. जमिनीची वाताहत झाली. परंतु सरकार मात्र कर्जमाफी करायला तयार नाही. येत्या 3 ऑक्टोबरपर्यंत सरकारने निर्णय घेतला नाही, तर 28 ऑक्टोबर रोजी नागपूर येथे शेतकरी आंदोलन करून कर्जमाफीचा निर्णय करण्यास सरकारला भाग पाडू, असा इशारा प्रहार संघटनेचे संस्थापक बच्चू कडू यांनी दिला. कोळगाव यथ सैनिक संघटनेचे भानुदास सपाटे मेजर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शेतकरी मेळावा व रास्ता रोको आंदोलन प्रसंगी कडू बोलत होते.
शेतकऱ्यांच्या मागे मात्र कोणीही उभे राहण्यास तयार नाही. वेगवेगळ्या प्रकारचे वाद उकरून काढून, सर्वसामान्य जनतेची विभागणी करून राजकारण करणारे केंद्रातील व राज्यातील सरकार शेतकऱ्यांच्या भल्यासाठी कर्जमाफीचा निर्णय घेत नाही. त्यांना अर्थकारण महत्त्वाचे आहे. शहरामधून मिळणारा कर त्यांना महत्त्वाचा आहे. (Latest Ahilyanagar News)
शेतकऱ्यांच्या जीवावर मतांवर निवडून आलेला नेता सुद्धा शेतकऱ्यांच्या मालाला बाजार भाव देण्यास तयार नाही. शेतकरीही वेगवेगळ्या पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतील, पण स्वतःच्या अस्तित्वासाठी आंदोलनात सहभागी व्हायला तयार नाही. शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या नेत्यांना मते देण्यास तयार आहे. बाप मेला तरी चालेल पण नेता जिवंत राहिला पाहिजे, अशी मानसिकता समाजाची झाली असून आम्ही मात्र नेता मेला तरी शेतकरी बाप जिवंत राहिला पाहिजे यासाठी लढा उभा केला आहे.
मेळाव्यात विनोद परदेशी, मधुकर लगड, बाळासाहेब नलगे, मिठू शिरसाट, सरपंच पुरुषोत्तम लगड यांनी आपले विचार मांडले. मेळाव्यासाठी हेमंत नलगे, विश्वास थोरात, राऊत ,संतोष पवार, मच्छिंद्र नलगे, नितीन डुबल, डी. एल. लगड, नितीन नलगे, ओंकार नलगे, संजयदेवा तरडे, चिमणराव बाराहाते, संकेत नलगेे उपस्थित होते. आभार हेमंत नलगे यांनी केले.
यावेळी परिसरातील सत्ताधारी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि विरोधक काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार), शिवसेना (ठाकरे गट), तसेच प्रहार संघटना अशा सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली.