शिवछत्रपती पुरस्कार Pudhari
अहिल्यानगर

Shivchatrapati puraskar : अस्लम इनामदार, शंकर गदई यांना शिवछत्रपती पुरस्कार

या पुरस्कारांमुळे नगरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला

पुढारी वृत्तसेवा

Shivchatrapati Puraskar नगर : राष्ट्रीय पातळीवर जिल्ह्याचे नाव रोशन करणार्‍या दोन कबड्डीपटूंना राज्य शासनाचा 2023-24 साठीचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार आज जाहीर झाला. टाकळीभान (ता. श्रीरामपूर) येथील अस्लम इनामदार आणि भेंडा (ता. नेवासा) येथील शंकर गदई अशी या पुरस्कारप्राप्त खेळाडूंची नावे आहेत. या पुरस्कारांमुळे नगरच्या शिरपेचात याही वर्षी लागलेला मानाचा तुरा खोवला गेल्याचे क्रीडा क्षेत्रात मानले जात आहे.

राज्य सरकारतर्फे क्रीडा क्षेत्रात दिला जाणारा सर्वोत्कृष्ट वैयक्तिक पुरस्कार म्हणून शिवछत्रपती पुरस्कार ओळखला जातो. 1970 च्या दशकापासून या पुरस्काराचे वितरण केले जाते. सन 2023-24च्या पुरस्कारांची यादी मंगळवारी सरकारतर्फे जाहीर करण्यात आली.

पुरस्कार मिळालेला कबड्डीपटू अस्लम इनामदार श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील रहिवासी असून, तो आक्रमक खेळासाठी ओळखला जातो. टाकळीभान येथील ओन्ली साई क्रीडा मंडळाचा हा खेळाडू नगर जिल्हा संघाकडून खेळत होता. 3-4 वर्षांपासून तो राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेत ठाणे जिल्ह्याच्या संघाकडून खेळतो.

23 फेब्रुवारी 2000 रोजी मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेला अस्लम देशभरात लोकप्रिय असलेल्या प्रो-कबड्डी स्पर्धेत 2022 मध्ये प्रथम पुणेरी पलटण संघाचा खेळाडू होता. 2022या आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघात अस्लमचा समावेश होता. 2011मध्ये वडिलांच्या निधनानंतर हॉटेलमध्ये काम करून अस्लमने आईसह अत्यंत हालाखीचे दिवस काढले. त्यातूनही कबड्डीसाठी मात्र त्याने भरपूर मेहनत घेतली. त्याचे फळ त्याला मिळाल्याचे मानले जात आहे.

नेवासा तालुक्यातील भेंडा येथील शंकर गदई याचा जन्म 3 ऑक्टोबर 1997 रोजी शेतकरी कुटुंबात झाला. त्याचे शिक्षण जिजामाता कॉलेजमध्ये झाले. शंकर राज्य पातळीवर नगरसह पालघर आणि गोंदिया या जिल्ह्याच्या संघांकडून खेळला. जिजामाता क्रीडा मंडळाचा (भेंडा) हा खेळाडू महाराष्ट्र संघाचा कर्णधार असताना संघाला रौप्य पदक मिळाले होते. 70व्या वरिष्ठ राज्य कबड्डी स्पर्धेत अहिल्यानगर संघाकडून खेळताना त्याने ‘टॉप परफॉर्मर ऑफ द टूर्नामेन्ट’ हे बक्षीस पटकावले होते. प्रो कबड्डी लीगमध्ये सर्वप्रथम 2022 मध्ये गुजरात जायंट्स संघाने त्याला खरेदी केले होते. नंतर 2023च्या हंगामात तो तेलुगू टायटन्स या संघाचा खेळाडू झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT