Ashok Kharat Pudhari
अहिल्यानगर

Ashok Kharat: भोंदू अशोक खरात प्रकरणात 3 कोटींचा व्यवहार; शेवगावसह सहा जणांना समन्स

शिर्डी जमीन व्यवहाराआधी खात्यात मोठी रक्कम जमा; समता पतसंस्थेतील 60 कोटी गैरव्यवहाराचाही उलगडा

पुढारी वृत्तसेवा

नगर: भोंदू अशोक खरातचे काळे साम्राज्य उभारण्यात अनेक उद्योजक, राजकीय नेत्यांचेही आर्थिक बळ मिळाल्याचा संशय पोलिसांना आहे. शिर्डीत चार एकर जमीन व्यवहारापूर्वी खरातच्या नाशिकमधील दोन बँक खात्यात नगर, नाशिकच्या सहा जणांनी सुमारे 3 कोटींपेक्षा अधिक रक्कम आरटीजीएसने टाकल्याचे समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे यात नगर जिल्ह्यातील शेवगावच्या चौघांचा समावेश आहे. नाशिकच्या दाम्पत्यासह शेवगावच्या चौघांना पोलिसांनी बुधवारी चौकशीसाठी पाचारण केल्याचे सूत्रांनी सांगितले.

भोंदू खरात, त्याची पत्नी कल्पनाची नाशिक आणि सिन्नर येथील बँक ऑफ बडोदा आणि युनियन बँक या दोन राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये खाती आहेत. त्यात मागील दोन वर्षांत 21 कोटींपेक्षा अधिक व्यवहार झाले आहेत. शिर्डीतील रावसाहेब गोंदकर यांच्या चार एकर जमिनीची पाच कोटींना खरेदी करण्यात आली होती. अशोक खरातने गोंदकर यांना ही रक्कम वेगवेगळ्या तारखांना वर्ग केली होती.

मात्र, रावसाहेब गोंदकर याने फसवणूक झाल्याची फिर्याद दिल्यानंतर शिर्डी पोलिसांनी अशोक खरात, त्याची पत्नी कल्पना खरात, यासह अरविंद बावके, किरण सोनवणे आणि अशोक तांबे यांच्याविरोधात सावकारकी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, अशोक खरात याच्या बँक खात्यांची चौकशी सुरू असताना समता पतसंस्थेतील 100 बनावट खात्यांवरील 60 कोटींचा गैरव्यवहार शिर्डी पोलिसांच्या तपासात पुढे आला. याशिवाय, शिर्डीतील जमीन खरेदी करण्यापूर्वी काही दिवस अगोदर अशोक खरात याच्या नाशिक आणि सिन्नर येथील दोन बँकांमध्ये तीन कोटींपेक्षा अधिक रक्कम जमा झाली होती, हेही तपासात निदर्शनास आले.

अहिल्यानगरचे एसपी सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनात अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. अशोक खरातच्या बँक खात्यात पैसे कोणी पाठविले, याची माहिती संकलित केली गेली. ट्रान्झॅक्शन आयडीवरून ‌‘त्या‌’ लोकांना डिटेक्ट करण्यात आले. यामध्ये नाशिक येथील एका दाम्पत्यासह नगर जिल्ह्यातील शेवगावच्या चौघांचा समावेश असल्याचे प्रथमदर्शनी समोर आल्याचे समजते. शिर्डी पोलिसांनी संबंधित सहा जणांना समन्स पाठवून चौकशीसाठी बोलावले आहे. आज-बुधवारी हे सहा जण हजर होणार असून, त्यांनी कोणत्या कारणासाठी खरातच्या बँक खात्यात हे पैसे पाठवले, याचे रहस्य उलगडणार आहे.

चार एकर जमिनीचा ताबा घेण्याचा प्रयत्न

रावसाहेब गोंदकर यांची फसवणूक करून अशोक खरातने त्यांची चार एकर जमीन हडपली. खरातला अटक होण्याच्या एक दिवस अगोदर अज्ञातांकडून या जमिनीवरील गहू हार्वेस्टरने घाईघाईने काढून त्याची विक्रीही करण्यात आल्याचे समोर आले. आता कागदावर मालक असलेला खरात तुरुंगात असताना, मंगळवारी अचानक अज्ञात व्यक्तीने चार एकर जमीन नांगरून त्यावर ताबा घेण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.

‌‘समता‌’चे दप्तर ईडीच्या ताब्यात

‌‘समता‌’च्या राहाता शाखेत ईडीच्या पथकाने सोमवारी 12 तास सखोल चौकशी केली. त्यात संस्थेतील संबंधित संशयास्पद 100 खात्यांचा दस्तावेज आणि त्यावरील आर्थिक व्यवहारांची माहिती असलेले पेनड्राईव्ह ईडीच्या पथकाने अधिक चौकशीसाठी सोबत नेल्याचीही माहिती सूत्रांकडून सांगण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT