Ashok Kharat Case Pudhari
अहिल्यानगर

Ashok Kharat Case: 62 कोटींचा ब्लॅक मनी व्हाईट करण्यासाठी भोंदू खरातचा ‌‘समता‌’मार्ग

नगर, नाशिकच्या पतसंस्थेत 132 बोगस अकौंटस्‌‍

पुढारी वृत्तसेवा

गोरक्ष शेजूळ/ डॉ.सूर्यकांत वरकड

नगर: भोंदू अशोक खरातच्या चौकशीत दररोज नवनवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. लैंगिक शोषणासोबतच तो ‌‘कमाई‌’तही माहीर असल्याचे स्पष्ट झाले आहे. खास भक्तांच्या पॅनकार्ड व आधार कार्डचा गैरवापर करत त्याने नगर-नाशिकमध्ये दोन पतसंस्थेत तब्बल 132 बोगस बँक खाते उघडले.

प्रत्येक खात्याला खरातच नॉमिनी असून त्याचाच मोबाईल नंबर लिंक असल्याचे पोलिस तपासात समारेर आले. या खात्यातून अहिल्यानगरमध्ये ‌‘समता‌’चा मार्ग स्विकारत त्याने 62 कोटीचे आर्थिक व्यवहार केल्याचे समजते. अर्थात खरातचा रोकडा व्यवहार म्हणजे ‌‘ब्लॅक मनी व्हाईट‌’ करणे असल्याचा संशय पोलिसांना असून त्यादृष्टीने तपास सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

दहावी नापास असला भोंदू खरातचे काळे कारनामे संतापजनक आणि तितकेच चक्रावून टाकणारे आहेत. लैगिंक शोषणाच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना त्याच्या आर्थिक भरभराटीचा पर्दाफाश होण्यास सुरूवात झाली आहे.

भोंदूगिरी करताना तो केवळ रोकडा घ्यायचा. ही रोकड व्हाईट करण्याची नामी युक्ती त्याने शोधली. जवळच्या खास अंध भक्ताचे पॅन व आधार कार्डाचा वापर करून त्याने नाशिकमधील एक आणि शिर्डीतील एक अशा दोन पतसंस्थेत 132 बँक खाते उघडले.

या प्रत्येक खात्याला नॉमिनी हा खरातच असून त्या खात्यांना त्याचा मोबाईल नंबर लिंक आहे. त्यामुळे या खात्यात कोणताही व्यवहार झाला तरी त्याचा मेसेज त्यालाच जात. ही सगळी खाते तोच ऑपरेट करत असल्याचा संशय असून पोलिसांनी त्याची पालमुळ खोदून काढण्यास सुरूवात केली आहे. त्यातूनच ही धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती लागली.

खरातचा 60 कोटीचा ‌‘समते‌’चा मार्ग

खरातने ज्यांच्या नावे पतसंस्थेत खाते उघडले, त्यातील अनेकांनी त्याचा थांगपत्ताही नसल्याचे समजते. त्या खात्याचे सगळे आर्थिक व्यवहार हा खरातच करत असल्याचा संशय आहे. याच माध्यमातून नाशिकच्या पतसंस्थेत अडीच कोटी तर नगरच्या पतसंस्थेत त्याने 60 कोटीचे व्यवहार करत खरातने ‌‘समता‌’ मार्गाचा अवलंब केल्याचे समोर आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT