Ahilyanagar Crime Dattatray Khemnar Arrest Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Crime: अशोक खरात प्रकरणाचा भांडाफोड करणाऱ्या पत्रकारावर खंडणी व ॲट्रॉसिटीचा गुन्हा; पोलिसांनी केली अटक, काय आहे प्रकरण?

Dattatray Khemnar Arrest: श्रीरामपूर तालुक्यातील फत्त्याबाद येथे महिला ग्रामविकास अधिकाऱ्याकडे स्मशानभूमीच्या कामासाठी १ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे.

Rahul Shelke

Dattatray Khemnar Arrest: अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपुर तालुक्यातील फत्त्याबाद येथील एका महिला ग्रामविकास अधिकाऱ्याकडे स्मशानभूमीच्या विकासकामात १ लाख रुपयांची खंडणी मागून जातीवाचक शिवीगाळ, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात कथित पत्रकार दत्तात्रय पोपट खेमनार याच्याविरुद्ध खंडणी, ॲट्रॉसिटी आणि शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला रात्री अटक केली आहे.

फत्त्याबाद ग्रामपंचायत कार्यालयात २०२२ पासून ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या माधवी नामदेव पलघडमल (वय ४५) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. सध्या फत्त्याबाद गावात स्मशानभूमीत मुरुम टाकून जमीन सपाट करण्याचे शासकीय काम सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खरात प्रकरणामुळे चर्चेत आलेला कथित पत्रकार दत्तात्रय खेमनार हा गेल्या १० ते १२ दिवसांपासून महिला अधिकाऱ्याला वारंवार फोन करून त्रास देत होता. "मी भल्या-भल्यांना कामाला लावतो, मला स्मशानभूमीच्या कामात १ लाख रुपये द्यावे लागतील; नाहीतर काम करू देणार नाही आणि खोट्या प्रकरणात अडकवून नोकरी घालवेन," अशी धमकी त्याने दिली होती.

वारंवार होणाऱ्या त्रासाला आणि धमक्यांना घाबरून महिला अधिकाऱ्याने १४ सप्टेंबर रोजी आरोपीला १,१०० रुपये ऑनलाईन पाठवले होते. तरीही खेमनारचा पैशांसाठी तगादा सुरूच होता. याशिवाय, त्याने मुरूम पुरवठा करणाऱ्या संबंधित ठेकेदाराकडूनही पैसे उकळल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

अखेर महिला अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून लोणी पोलिसांनी दत्तात्रय खेमनारविरुद्ध शासकीय कामात अडथळा, खंडणी आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (ॲट्रॉसिटी) गुन्हा नोंदवून त्याला बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT