Ashok Kharat Case Pudhari
अहिल्यानगर

Ashok Kharat Case: सह्या मिसमॅच.. 23 कोटींचे बोगस व्यवहार; सहकार विभागाच्या चौकशीत ‌‘समता‌’मधील सत्यता

पोलिस, ईडीनंतर आता सहकार विभागाकडून समता पतसंस्थेची चौकशी सुरू आहे.

पुढारी वृत्तसेवा

नगर: भोंदू अशोक खरात प्रकरणात चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या समता पतसंस्थेची चौकशी सहकार विभागाकडून सुरू आहे. खरात नॉमिनी असलेल्या खात्यात आजपर्यंतच्या चौकशीत 23 कोटींचे बोगस व्यवहार झाल्याचे उघड झाले असून, विड्रॉल स्लिपवरील सह्यामध्ये विसंगती असल्याचे समोर आले.

पोलिस, ईडीनंतर आता सहकार विभागाकडून समता पतसंस्थेची चौकशी सुरू आहे. जिल्हा विशेष लेखा परीक्षक गौतम निकाळजे यांच्या नेतृत्वात पाच लेखापरीक्षांचे पथक पतसंस्थेत तळ ठोकून असून, बँक खाती उघडतानाचे अर्ज, त्यावरील स्वाक्षऱ्या, ओळखदार व्यक्ती, तसेच संबंधित खात्यांवरील आर्थिक व्यवहारांची बारकाईने तपासणी केली जात आहे.

दरम्यान, संबंधित खाते उघडतानाचा अर्ज आणि डिपॉझीट, विड्रॉल स्लीपवरच्या स्वाक्षऱ्या ‌‘मिसमॅच‌’ असल्याचे निदर्शनास येत असून, आतापर्यंत 23 कोटींचे व्यवहार बोगस आढळल्याचे विश्वसनिय सूत्रांकडून सांगण्यात आले. तपासणीनंतर पूर्णत्वास गेल्यानंतर हा आकडा वाढू शकतो, आठवडाभरात संपूर्ण व्यवहाराची चौकशी पूर्ण होण्याची शक्यता असल्याची माहिती सहकार विभागाच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली.

समता पतसंस्थेच्या राहाता शाखेत भोंदू खरात नॉमिन असलेली 57 लोकांच्या 100 खात्यातून सुमारे 60 कोटीचे व्यवहार झाल्याचे पोलिस तपासात पुढे आले होते. खातेधारकांमध्ये अनेक प्रतिष्ठीतांचा समावेश होता. त्यांची शिर्डी पोलिसांनी चौकशी केली. पोलिस चौकशीत सर्वच खातेधारकांनी खाते आपण उघडलेले नसून, त्यावरील स्वाक्षऱ्या आणि व्यवहाराचा इन्कार करणारे जबाब दिले आहेत.

मुंबईतील दिनेश परब यांच्या फिर्यादीवरून भोंदू खरात व राहाता शाखा व्यवस्थापकाविरोधात गुन्हाही दाखल झालेला आहे. शिर्डी पोलिसांचा तपास सुरू असतानाच, काही दिवसांपूर्वीही ईडीचे पथकही पतसंस्थेत येवून गेले. ईडीने तपासणी करत, आवश्यक दस्तावेज चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे सांगितले जाते.

दरम्यान, ‌‘समता‌’मधील बँक खाती व व्यवहारांची चौकशी करून 15 दिवसांत वस्तूनिष्ठ अहवाल सादर करण्याचे आदेश सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी 17 एप्रिल रोजी बजावले होते. उपनिबंधक मंगेश सुरवसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा विशेष लेखा परीक्षक गौतम निकाळजे आणि सहायक निबंधक गणेश औटी यांची त्रिसदस्यीय समिती चौकशीसाठी गठीत केली गेली.

दरम्यान, समितीचे अध्यक्ष सुरवसे रजेवर असल्याने गौतम निकाळजे यांनी चौकशी सुरू केली आहे. पाच ऑडीटरचे पथक ‌‘समता‌’ च्या राहाता शाखेतील दप्तर तपासणी करत आहे. स्वतः निकाळजे यांनीही चौकशीत सहभाग घेतला.

दरम्यान, सहकार आयुक्तांनी दिलेला 15 दिवसांचा कालावधी संपुष्टात आला आहे. मात्र अजुनही अहवाल गेला नाही. तपासाची व्याप्ती मोठी आणि तितकीच गंभीर असल्याने विलंब होत असल्याचे सहकार विभागाकडून सांगण्यात आले.

संशयास्पद खात्यांची संख्या 108

राहाता शाखेतील सर्व खात्यांची ई केवायसी, व्यवहार विशेषतः डिपॉझीट, विड्रॉल स्लीप (पैसे टाकले-काढल्याच्या पावत्या) यावरील स्वाक्षऱ्यांची पडताळणी केली जात आहे. याशिवाय खाते उघडताना ‌‘ओळख‌’ दाखवलेल्या व्यक्ती आणि त्यांच्या स्वाक्षऱ्यांचाही बारकाईने अभ्यास केला जात आहे. आतापर्यंत साधारणतः 23 कोटींचे व्यवहार आढळलेल्या 45 पेक्षा अधिक संशयीत खात्यांची तपासणी पूर्ण झाली आहे. संशय वाढविणारी अशी 108 खाते असू शकतात, असा प्राथमिक अंदाज सहकार विभागाच्या तपासणी पथकाने वर्तविला आहे.

फॉरेन्सिक टीमही ‌‘समता‌’त दाखल

सहकार विभागासोबतच ‌‘फॉरेन्सिक‌’ची टीमही कागदपत्रे तसेच त्यावरील स्वाक्षऱ्यांची पडताळणीसाठी समता संस्थेत पोहचल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली. बुधवारी तीन कर्मचाऱ्यांची टीम उशीरापर्यंत स्वाक्षऱ्या व अन्य कागदपत्रांची तपासणीचे काम करत होती, असे समजते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT