नगर: आषाढी एकादशीनिमित्त एसटी महामंडळाच्या अहिल्यानगर विभागाच्या वतीने पंढरपूर यात्रेला जाणार्या भाविकांसाठी जादा बसची व्यवस्था केली. शनिवारी (दि.२५) पंढरपुरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर कळसाचे दर्शन घेऊन वारकरी परतू लागले आहेत. त्यामुळे महामंडळाच्या बस गर्दीने खचाखच भरुन येत आहेत. गेल्या सहा दिवसांपासून तारकपूर बसस्थानक भाविकांच्या गर्दीने फुलून गेले आहे.
पंढरपूर यात्रेसाठी अहिल्यानगर विभागाने ४३० जादा बसची व्यवस्था केली. त्यासाठी प्रत्येक आगारासाठी बसनिश्चित केल्या होत्या. बहुतांश बस तारकपूर बसस्थानकातून जात होत्या. सोमवारपासून पंढरपूर यात्रा सुरु झाली असून, भाविक या बसच्या माध्यमातून पंढरपूर यात्रेसाठी रवाना होत होते.
आषाढी एकादशीनिमित्त गेल्या दोन दिवसांपासून पंढरपुरात मोठी गर्दी झाली असून, गेल्या सहा दिवसांपासून तारकपूर बसस्थानक भाविकांच्या गर्दीने फुलून गेले आहे. श्री विठ्ठलाचे दर्शन मिळणे अवघड असल्यामुळे भाविक कळसाचे दर्शन घेऊन दिंडीतील भाविक महामंडळाच्या बसने परतत आहेत. त्यामुळे दर्शनाहून परतणार्या भाविकांमुळे एसटी बस होऊसफूल धावू लागली आहे.
त्यामुळे तारकपूर बसस्थानक पंढरपूरला जाणार्या आणि येणार्या भाविकांनी फुलून गेले आहे. आणखी दोन तीन दिवस जादाबससेवा उपलब्ध असणार आहे. त्यामुळे तारकपूर बसस्थानकावर गर्दीही कायम असणार आहे.