AI for Farming जामखेड : कृत्रिम बुद्धिमत्ता (AI ) तंत्रज्ञानासाठी राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये मोठी तरतूद केली आहे. यापुढे शेती करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्त्ेचा (AI ) याचा वापर करणार आहोत. ऊसासासाठी जेवढं पाणी लागतं ते कृत्रिम बुद्धिमत्ता (AI ) सांगणार आहे. त्यामुळे शेतीचा खर्च कमी होऊन उत्पादनात दीड पटीने वाढ होणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने शेतीबाबत ठोस धोरण आखल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
जामखेड येथे शिव, फुले व आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात पवार बोलत होते. यावेळी माजी आमदार लहू कानडे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील, राजेंद्र गुंड, संध्या सोनवणे, बाळासाहेब नाहाटा , कपिल पाटील, अक्षय शिंदे, सचिन गायवळ उपस्थित होते. यावेळी पवार यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार व ऋषिकेश शेलार यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार पक्षामध्ये प्रवेश केला.
पवार म्हणले, जामखेड-सौताडा राष्ट्रीय महामार्गाबाबत केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याशी बोलून हा रस्त्याचा प्रश्न तत्काळ मार्गी लावला जाईल. जेवढा रस्ता आहे तेवढा रस्ता करणे गरजेचे आहे. रस्त्यासाठी ठोस भूमिका घ्यावी लागते. त्यामुळे रस्त्याबाबत ठोस भूमिका घेऊन तो प्रश्न मार्गी लावला जाईल.
जामखेडच्या एसटीचे काही प्रश्न सुटले नाहीत. अजून बरेच प्रश्न मार्गी लागायचे आहेत. मागच्या वेळेस आमदार रोहित पवार आमच्याबरोबर होते. त्यावेळेस अडीच वर्षांत किती कोटी रुपये मी दिले त्याची माहिती घ्यावी, आता ते माझ्याबरोबर नाहीत सुदैवाने प्रा. राम शिंदे यांना महायुतीच्या सरकारने विधान परिषदेच्या सभापती केले आहे. त्यामुळे त्यांच्या व माझ्या माध्यमातून कर्जत-जामखेडचा विकास केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
पवार म्हणले, जात, धर्म, भाषा, प्रांत अशा कारणांवरून समाजात दरी निर्माण करण्याचा प्रयत्न काही राज्यांमध्ये चालू आहे. परंतु तसा कोणताही प्रयत्न आपल्याला यशस्वी होऊ द्यायचा नाही. आपण कायम छत्रपती शिवाजीमहाराज, शाहू, फुले व आंबेडकरांच्या विचारधारेतून सामाजिक ऐक्य टिकविले आहे. सर्वसमावेशक विकासाच्या मार्गावर आपल्याला पुढे जायचे असून,ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असली पाहिजे.
महानगरांमध्ये ड्रेनेजमधील गॅसमुळे अनेक मजुरांचा मृत्यू होत आहे. त्यासाठी राज्य सरकाने 100 रोबोट तिथे आणले आहेत. आता येथून पुढे ड्रेनेजमध्ये रोबोटच्या माध्यमातून साफसफाई केली जाईल. त्यामुळे मजुरांना जीव गमवावा लागणार नाही, असेही पवार यावेळी म्हणाले.
स्मारकाचे काम अभिमानास्पद करू
श्री क्षेत्र चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचे कामा सर्वांना अभिमान वाटेल, असे करणार असून, त्यासाठी सभापती प्रा. राम शिंदे यांच्याशी चर्चा केली जाईल. स्मारकामुळे पुढच्या पिढीला देखील पुण्यश्लोक आहिल्यादेवी यांचा इतिहास डोळ्यासमोर उभा रहिला पाहिजे, त्यांनी बारव कशा बांधल्या, पाण्याची सोय कशी केली, मंदिरे कशी उभारली, याचा अंतर्भाव स्मारकात केला जाणार असल्याचे पवार यांनी सांगितले.