बिबट्याची शिकार pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar News: माथणीत बिबट्याची शिकार! सख्या भावांना अटक

बिबट्याची शिकार करण्यात आल्याची ही पहिलीच घटना असल्याने परिसरात खळबळ उडाली

पुढारी वृत्तसेवा

(Latest Ahilyanagar News)

शशिकांत पवार

नगर तालुका: नगर तालुक्यातील माथमी शिवारात शुक्रवार (दि. 30) बिबट्याची शिकार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. तालुक्यात बिबट्याची शिकार करण्यात आल्याची ही पहिलीच घटना असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. वनविभागाच्या वतीने सदर घटनेचा तत्काळ तपास करून याप्रकरणी दोन सख्ख्या भावांना अटक केली आहे.

शुक्रवारी सकाळी 11 वाजता माथणी परिसरातील परदेशी वस्तीवर बिबट्याचे दर्शन झाले होते. त्यावेळी वस्तीवरील मोकळ्या शेतातून बिबट्या जात असताना त्याच्यावर कुर्‍हाडीने हल्ला करीत ठार केल्याची घटना वनविभागाच्या सतर्कतेमुळे उघडकीस आली आहे. नगर तालुक्यात गेल्या पाच ते सात वर्षांपासून बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परंतु बिबट्याची शिकार करण्याची ही पहिलीच घटना असल्याने वनविभाग ही सतर्क झाला आहे. (Ahilyanagar news update)

गुंडेगाव परिमंडळामधील माथणी शिवारात एका नर बिबट्याची शिकार झाली असल्याची गुप्त माहिती वनविभागाच्या अधिकार्‍यांना मिळाल्यानंतर उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, सहायक उपवनसंरक्षक आश्विनी दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश तेलोरे यांनी सापळा रचून अवघ्या 2 तासांत आरोपीना पकडले.

बिबट तसेच इतर वन्यप्राण्यांबद्दल नागरिकांमध्ये खूप अंधश्रद्धा आहेत. वन्यपानप्राण्यांच्या संरक्षणासाठी वन्यप्राणी संरक्षण कायदा 1972 हा कडक कायदा बनविण्यात आला आहे. सर्व वन्यप्राण्यांचे जतन व संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी वनविभागाला सहकार्य करण्याची गरज आहे. तालुक्यात बिबट्या बाबत जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.
मनेश जाधव, वनपाल, जेऊर मंडळ

बिबट्याच्या शिकारीबाबत कल्याणसिंग दशरथसिंग परदेशी (वय 63) व अंबरसिंग दशरथसिंग परदेशी ( वय 52, दोघे रा. माथणी ता.नगर) यांना वनविभागाच्या अधिकार्‍यांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली देत मृत बिबट्या त्यांच्या शेतात गट नंबर 10 मध्ये पुरून टाकल्याचे सांगितले. त्यानुसार वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश तेलोरे, वनपाल शैलेश बडदे,वनरक्षक अर्जुन खेडकर, वनपाल मनेश जाधव, वनपाल गायकवाड यांनी घटनास्थळी जात बिबट्याचा मृतदेह उकरून बाहेर काढला.

बिबट हा प्राणी वनविभागाच्या अनुसूची क्रमांक एक मध्ये येत आहे. त्याची शिकार हा अजामीनपात्र गुन्हा आहे. शेताच्या संरक्षणासाठी लावण्यात आलेल्या तारांमध्ये विद्युत प्रवाह सोडणे. त्यामुळे वन्य प्राण्यांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे. बिबट्याच्या शिकारीबाबत गुन्हा निष्पन्न झाल्यास सात वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. वन्यप्राण्यांचे संरक्षण ही सर्व नागरिकांची जबाबदारी आहे.
अविनाश तेलोरे, वनपरिक्षेत्र अधिकारी, वनविभाग

बिबट्याचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर बिबट्याच्या पायाच्या नख्या व मिशांचे केस गायब असल्याचे वनाधिकार्‍यांच्या लक्षात आले. आरोपींकडे याबाबत अधिक चौकशी केली असता, नख्या व मिशांचे केस शेताच्या बांधावर बरणीत ठेवल्याचे निष्पन्न झाले. नख्या तसेच मिशांचे केस वनविभागाने हस्तगत केले आहेत. बिबट्याच्या मृतदेहाचे सविच्छेदन पशुसंवर्धन अधिकारी डॉ. काळे यांनी केले. त्यानंतर अहिल्यानगर वनविभाग कार्यालयातील परिसरात बिबट्याचे दहन करण्यात आले.आरोपींना मृत बिबट्यासह ताब्यात घेऊन गुन्हा नोंदविला आहे.

मानवाचा दिवसेंदिवस जंगलामधील वाढत्या हस्तक्षेपामुळे वन्यप्राणी मानव वस्तीकडे धाव घेत असतात. पर्यावरणाचा समतोल व अन्नसाखळी सुरक्षितपणे चालण्यासाठी वन्यप्राण्यांची गरज आहे. त्यामुळे बिबट्या दिसल्यास त्याची छेड न काढता तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा.
शैलेश बडदे, वनपाल, गुंडेगाव मंडळ

देशात बिबट्यांच्या नख्या तसेच मिशांच्या केसांबाबत काही अंधश्रद्धा आहे. त्यासाठी बिबट्यांची तस्करी केली जाते. बिबट्यांच्या कातडीची ही तस्करी करण्याच्या घटना देशांमध्ये घडलेल्या आहेत. त्यादृष्टीने ही वनविभागाच्या अधिकार्‍यांकडून तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT