झेडपीच्या मालमत्तेवरही हातोडा pudhari
अहिल्यानगर

झेडपीच्या मालमत्तेवरही हातोडा; पाडलेली संरक्षण भिंत बांधून द्या नाहीतर गुन्हा नोंदवू

सीईओंची आयुक्तांना तंबी

पुढारी वृत्तसेवा

नगर : अप्पू हत्ती चौक ते दिल्लीगेट दरम्यान रस्त्याचे काम सुरू असून याच दरम्यानच्या लालटाकीजवळील जिल्हा परिषद निवासस्थानाची 50 फूट लांबीची भिंत जेसीबीने पाडण्यात आली. त्यावरून महापालिका आणि जिल्हा परिषद प्रशासनातील वादाला तोंड फुटले आहे. अतिरीक्त सीईओ लांगोरे यांनी मनपा प्रशासनाला याबाबत जाब विचारला, तर सीईओ अशिष येरेकर यांनी तत्काळ भिंत बांधून द्या, अन्यथा गुन्हा दाखल करू असा थेट इशाराच आयुक्तांना फोनवरून दिल्याचे समजते. त्यानंतर रात्रीच ही भिंत पुन्हा बांधून देण्यासाठी मनपा कामाला लागल्याचे समजते.

लालटाकीजवळ मनपा प्रशासनाकडून रस्त्याचे काम सुरू आहे. गुरुवारी सायंकाळनंतर जिल्हा परिषदेच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांचे निवासस्थान असलेल्या संरक्षक भिंतीवर जेसीबी चालवल्याने ती पडली. सुरक्षारक्षकांनी जिल्हा परिषद प्रशासनाला ही माहिती कळवली. अतिरीक्त सीईओ संभाजी लांगोरे हे तत्काळ तिथे दाखल झाले. त्यांनी दक्षिणचे कार्यकारी अभियंता सागर चौधरी, उपअभियंता खेडकर यांच्यासह मनपाच्या निंबाळकर, पारखे या अभियंत्यांनाही तेथे बोलावून घेतले.

म्हणे भिंतीला तडे गेले

लांगोरे यांनी भिंत पाडण्याचे कारण महापालिका अभियंत्यांने विचारले. भिंतीला तडे गेले होते, असे अजब कारण महाापालिकेच्या अभियंत्यांनी दिले. भिंतीला धक्का लागला हे समजू शकतो, मात्र 50 फूट लांब भिंत कशी पडू शकते, असा प्रश्न लांगोरे यांनी केल्यानंतर त्यावर मनपा अभियंता निरुत्तर झाली. दरम्यान ही माहिती सीईओ आशिष येरेकर यांच्यापर्यंत पोहचली. त्यांनी थेट महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांच्यांशी संपर्क साधला. पाडलेली भिंत तत्काळ बांधून द्या, अन्यथा गुन्हा दाखल करू, असा इशारा या बोलण्यात आयुक्तांना दिल्याचेही सूत्रांनी सांगितले. दरम्यान, रात्री उशीरापर्यंत मनपाकडून भिंत उभी करण्याचे काम सुरू झाल्याचे सांगण्यात आले.

आम्हाला हा अंदाज होताच, त्यामुळे याबाबत दक्षता घ्यावी, असे पत्र पूर्वीच मनपाला दिले होते. मात्र तरीही त्यांनी भिंत पाडली. सकाळपर्यंत भिंतीचे काम सुरू न केल्यास शहर अभियंता आणि ठेकेदारावर गुन्हा दाखल करणार आहोत. मी स्वतः आयुक्तांना तसे कळविले.
आशिष येरेकर, सीईओ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT